Weather Alert: मराठवाड्यासह राज्यावर पावसाचे ढग, दोन दिवस वातावरण ढगाळ, नंतर कडाक्याची थंडी!
मराठवाड्यासह राज्यभरात सध्या ढगाळ वातावरण असून हवेतील गारवाही वाढला आहे. औरंगाबादसह बीड, उस्मनाबाद, जालन्यात काही ठिकाणी पावसाचा फटका बसला. पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाचे वातावरण आहे. ही स्थिती किती काळ राहील, काय सांगतात हवामान तज्ज्ञ?
औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्याने मराठवाड्यासह (Rain alert) राज्यातील काही भागांना गारवा आणि ढगाळ वातावरण (Weather forecast) अशा दोन्ही स्थितीचा सामना करावा लागत आहे. औरंगाबाद शहरासह, ग्रामीण भागात तसेच मराठवाड्यातील काही भागात मंगळवारी वादळी वाऱ्यासह पाऊस (Heavy Rain) झाला. तसेच महाराष्ट्राच्या पश्चिम भागातही बदललेल्या हवामानाचा फटका बसत आहे. पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहिल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
औरंगाबादमधील प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, विरार, पालघर, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळतील. तसेच औरंगाबादमधील कन्नड, वैजापूर, गंगापूर तालुक्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात पुढील तीन दिवस वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यात औरंगाबाद, बीड, उस्मनाबाद, जालना जिल्ह्यात या वादळी वाऱ्याचा फटका बसेल. पुढील तीन दिवस म्हणजेच 4 डिसेंबरपर्यंत मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दक्षिण-पूर्व अरबी समुद्र,मालदीव,लक्षद्वीपवर चक्रिय स्थिती.तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती.येत्या २४ तासात दक्षिण-पूर्व अरबी समुद्र,मालदीव,लक्षद्वीपमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता
पुढचे ३ दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उद्या ओरेंज इशारा उत्तर भागात IMD pic.twitter.com/uZL83iQa7I
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 30, 2021
नंदूरबार, धुळे, जळगावात गारपीटीची शक्यता
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ध्रुवीय वारे आणि सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे वातावरणातील गारवा वाढेल. या स्थितीचा परिणाम म्हणून नंदूरबार, धुळे, जळगाव आदी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
3 तारखेनंतर अचानक थंडीत वाढ
बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण होऊन हे वारे पश्चिम बंगाल म्हणजेच कोलकत्याच्या दिशेने जातील. त्यामुळे 3 ते 4 तारखेनंतर वातावरणात अचानक बदल होऊन राज्यभरात अचानक थंडीत वाढ होईल, अशी माहितीही तज्ज्ञांनी दिली आहे.
इतर बातम्या-