Weather alert: राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता; गारपिटीचाही अंदाज
शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांवर रक्षणासाठी ताडपत्री अथवा प्लॅस्टिकचं आवरण टाकावे | Weather alert Maharashtra
मुंबई: राज्यातील काही भागांमध्ये आगामी दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांवर रक्षणासाठी ताडपत्री अथवा प्लॅस्टिकचं आवरण टाकावे, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. कालच पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले होते. तत्पूर्वी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही अवकाळी पाऊस झाला होता. (Weather alert Unseasonal rains and hailstorm expected in Maharashtra)
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, कुठं शेतीचं नुकसान, तर कुठं वीज पडून मृत्यू
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवडमधील परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला.
बारामती (पुणे)
बारामती शहर आणि परिसरामध्ये आज सायंकाळी 4 वाजता वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. सुमारे अर्धा तास हा पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळं उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची मात्र अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली.
जुन्नर
जुन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाला. रविवारी (2 मे) संध्याकाळी 6 वाजल्यापासून सोसाट्याचा वारा वाहत होता. अशातच जोरदार पावसाने हजेरी लावली. शेतामध्ये पाणी साचलेले आहे. उभ्या पिकांचे खूप नुकसान झाले. विजांचा कडकडाट चालू होता. शेतकरी बांधव मात्र आता काळजीत पडले आहेत.
सातारा
सातारा शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील अनेक भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. साडे चार वाजल्यापासून सातारा शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. मागील 4 दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात पाऊस पडत आहे.
हिंगोली
हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात आजही अवकाळी पाऊस झाला. अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे हळद उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. शेतात शिजवून टाकलेली हळद भिजत असल्याने शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होत आहे.
परभणी
परभणी शहरासह जिल्ह्यातील गंगाखेड सोनपेठ, पालम, पूर्णा तालुक्यात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे. सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गर्मीच्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळत आहे. तर शेतातील फळबागा, ज्वारी आणि काढणी झालेल्या हळदीचे नुकसान होत आहे.
चाळीसगाव
चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हजेरी लावली. तळेगाव येथे वीज पडून महिला जागीच ठार झाली आहे. ही घटना रविवारी (2 मे) दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी घडली. हिंमत मोरे यांच्या शेतात शेत मशागतीचे काम सुरू होते. दुपारी 3 वाजेच्या सुमारास वादळी वारा सुरू झाला. पाऊस सुरू झाला. त्याचवेळी झाडाच्या आडोशाला उभ्या असलेल्या वंदना हिंमत मोरे यांच्या अंगावर वीज कोसळून त्या जागीच ठार झाल्या.
वाशिम
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील नंधाना, चांडस गावासह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. मालेगाव तालुक्यातही काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र शेतकऱ्यांच्या शेतात काढणीला आलेल्या उन्हाळी भुईमूग, तीळ, मूग, सोयाबीन या पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.
नांदेडमध्ये सांयकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने आंबा, संत्रा, मोसंबी या फळबागांचे मोठे नुकसान झालेय. त्या बरोबर हळद आणि भाजीपाला वर्गीय पिकांचे देखील मोठे नुकसान झालेय. आजच्या या पावसाने वाढलेला उकाडा कमी होण्यास मदत झालीय, मात्र शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालेय. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच कंबरडे मोडणारी स्थिती निर्माण झालीय.
वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील भिवरी येथे मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द विजेचे जिवंत तार तुटून जमिनीवर पडलेले आहेत आज गावाशेजारी असलेल्या नाल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या 3 गायींना विजेच्या तुटलेल्या जिवंत तारेचा स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये मदन कच्छवे या शेतकऱ्यांच 1 लाख रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान गावात जनावरांना पिण्याच्या पाण्याचा दुसरा स्रोत नसल्याने गावातील सर्वच शेतकरी आपले पशुधन या नाल्यावर पाणी पिण्यासाठी नेतात. एकाच शेतकऱ्यांच्या 3 गायीचा मृत्यू झाल्याने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे. त्यामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संबंधित महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
अकोला
अकोल्यात पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळालाय. रात्रीही जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी आल्या होत्या.
हेही वाचा :
वादळीवारा, गारपीट, अवकाळी पावसाचं सांगलीत थैमान, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Weather Alert | महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाल्याचे मोठे नुकसान
(Weather alert Unseasonal rains and hailstorm expected in Maharashtra)