शेवटपर्यंत सस्पेन्स, शिंदे-फडणवीस-अजित पवार मंचावर एकत्र आले आणि…., वाचा शपथविधी सोहळ्याचा पूर्ण तपशील
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे जवळपास स्पष्ट होतं. पण एकनाथ शिंदे यांच्याबाबत शेवटपर्यंत सस्पेन्स बघायला मिळाला. विशेष म्हणजे शपथविधी सोहळ्यात तीनही नेत्यांचे हावभाव पाहता एकनाथ शिंदे मंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स त्यांचं नाव घोषित होत नाही तोपर्यंत कायम राहिला. अखेर त्यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे मोठ्या सस्पेन्सवर आता पडदा पडला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज महत्त्वाचा दिवस राहिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीच्या या तीनही प्रमुख नेत्यांचा शपथविधी सोहळा हा अतिशय भव्यदिव्य असा पार पडला. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, 22 राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला सिनेक्षेत्रासह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावलेली होती. हा कार्यक्रम जितका भव्यदिव्य राहिला तितकाच तो सस्पेन्स वाढवणारा देखील राहिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्राच्या मंत्रिमंडळातील अनेक केंद्रीय मंत्री आधी मंचावर उपस्थित झाले. मंचाच्या एका बाजूला सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होते. तर दुसऱ्या बाजूला मोठमोठे साधू-महंत या कार्यक्रमाला विराजमान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली.
सर्व दिग्गज नेतेमंडळी मंचावर उपस्थित होते. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नरेंद्र मोदी मंचावर आले. नरेंद्र मोदी यांचं व्यासपीठावर आगमन होत असताना, त्याच क्षणी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीनही नेते एकत्रपणे मंचावर दाखल झाले. त्यांनी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व दिग्गज नेत्यांसोबत हस्तांदोलन केलं. यानंतर ते आपल्या जागेवर स्थानापन्न झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आजूबाजूला बसले. पण एकनाथ शिंदे हे दोन खुर्च्या सोडून बाजूला बसले. त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? अशी शंका निर्माण झाली. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मंचावर दाखल झाले आणि शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
…आणि मोठ्या सस्पेन्सवर पडदा पडला
शपथविधी सोहळ्यात मंचावर देवेंद्र फडणवीस यांच्या डाव्या बाजूला अजित पवार बसले. तर उजव्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले. त्यांच्या उजव्या बाजूला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि त्यांच्या उजव्या बाजूला एकनाथ शिंदे हे बसले होते. नरेंद्र मोदी नियोजित जागेवर मंचावर आल्यानंतर राष्ट्रगीताला सुरुवात झाली. त्यानंतर महाराष्ट्र गीत गाण्यात आलं. यानंतर राज्यपाल राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यानंतर अजित पवार यांच्या नावाची घोषणा होईल, असं वाटत असताना सूत्रसंचालकांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आणि मोठ्या सस्पेन्सवर पडदा पडला. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तीनही नेत्यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी हा शपथविधी सोहळा संपन्न झाला, असं जाहीर केलं.