राजीनामा मागे घेतला नाही तर शरद पवार यांच्या हाती ‘या’ गोष्टी कधीच राहणार नाहीत
राष्ट्रवादीतला पवार प्ले थांबलाय, की मग नवा पॉवरप्ले सुरु झालाय, याचीही चर्चा होतेय. जवळपास सर्व बडे नेते आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याला विरोध करतायत. तर अजित पवार तो निर्णय योग्य असल्याचं सांगतायत.
मुंबई : राष्ट्रवादीचे सुप्रीमो म्हणून जे नावं गेली दोन दशकं गल्ली ते दिल्ली म्हणून चर्चिलं गेलं त्या शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताच राष्ट्रवादीत ड्रामा सुरु झाला. पद सोडलं तरी काम करत राहीन, हे पवारांनी स्पष्ट केलं. पण राजीनाम्याला विरोध सुरु झाला. जर तुम्ही राजीनामा देत असाल, तर आम्ही थांबून काय करायचं? म्हणत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना रडू कोसळलं. कार्यकर्ते सभागृहातच अडून बसले आणि शरद पवार राजीनामा मागे घेईपर्यंत आंदोलनाची घोषणा केली. हे सुरु असताना अजित पवारांची भूमिका काय, याची उत्सुकता होती. वातावरण भावनिक होत असताना असंख्यवेळा अजित पवारांनी कार्यकर्त्यांना ठोकलं.
शरद पवारांच्या राजीनाम्यावर तुम्ही भूमिका मांडा म्हणून कार्यकर्त्यांनी अजित पवारांना आग्रह केला. सुरुवातीला अजित पवार नाही म्हणाले. नंतर मात्र अजित पवारांनी माईक हाती घेतला आणि शरद पवारांचा राजीनाम्यामागे वय आणि इतर कारणं देत त्याला योग्य ठरवलं. अजितदादांच्या या भूमिकेनं अनेकांच्या भूवया उंचावल्या.
राष्ट्रवादीचे जवळपास बडे 9 नेते शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याच्या भूमिकेत होते. तर एकट्या अजित पवारांनी स्पष्टपणे राजीनामा योग्य असल्याचं म्हटलं. शरद पवारांच्या राजीनाम्यावर कुणाची काय भूमिका, हे चित्र जवळपास स्पष्ट झालं होतं. फक्त उरल्या होत्या त्या सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळेंनी आता बोलावं अशी मागणी होऊ लागली. पण अजित पवारांनी त्यांना थांबवलं.
मुद्दा पक्षाच्या अध्यक्षपदाचा असताना इथं कुटुंबाचा विषय कुठून आला? हा प्रश्नही अजित पवारांच्या भूमिकेनं अनेकांना पडला. मात्र आज जे घडलं त्याचं काही राजकीय कनेक्शन नाही ना? अशीही कुजबूत होत राहिली. शक्यता काय आहेत, त्याआधी शरद पवारांचा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा अर्थ काय होतो? ते जाणून घेऊयात.
राजीनाम्यानंतर शरद पवार ‘या’ गोष्टी आता करु शकणार नाहीत
राजीनाम्याचा अर्थ म्हणजे शरद पवार आता पक्षासाठी अधिकृतपणे धोरण ठरवू शकत नाहीत. राष्ट्रवादीचे संस्थापक म्हणून सल्ला देऊ शकतात, मात्र तो मान्य करावाच याचं पक्षावर बंधन नसेल. पक्षाचं धोरण आणि भूमिका याबद्दल जर नवीन अध्यक्ष झाला, तर त्याचे सर्वाधिकार त्यांच्याकडे जाणार.
आता आज आणि मागच्या महिन्याभरात घडलेल्या घडामोडींचे अर्थ एकमेकांशी लावून बघितल्यास, काय चित्र दिसतं ते पाहा. आजच्या घडामोडींवर अंजली दमानियांनी केलेलं ट्विट म्हणतंय की, आता राष्ट्रवादी आणि भाजप युतीचा मार्ग मोकळा झालाय का? भाजपला राष्ट्रवादी हवीय, पण ते शरद पवारांशिवाय. शरद पवारांचा राजीनामा स्वीकारला जावा, यासाठी अजित पवार आग्रही दिसत होते.
महाविकास आघाडीचं काय होणार?
याआधी जेव्हा-जेव्हा अजित पवारांना मविआ एकजूट राहणार का? असा प्रश्न विचारलाय. तेव्हा अजित पवारांचं उत्तर एकच राहिलंय. ते म्हणजे जोपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि दिल्लीतील काँग्रेसच्या नेतृत्वाचं एकमत आहे, तोपर्यंत मविआ अभेद्य राहिलं. पण जर शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष नसले, तर काय होणार? याचं उत्तर अपेक्षित नव्हतं, कारण कालपर्यंत हा प्रश्नही निर्माण झाला नव्हता.
‘त्या’ बातमीचा आजच्या घडामोडींशी संबंध?
गेल्या 10 दिवसात सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी मविआचं लवकरच विसर्जन होईल, हे जाहीरपणे म्हटलंय. त्याच्या आजच्या घडामोडींशी काही संबंध नव्हता ना? हाही एक प्रश्न आहे. 16 एप्रिलला ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’मध्ये एक बातमी छापून आली होती. त्याचा आजच्या घडामोडींशी काही संबंध लागतो का? हा देखील एक महत्त्वाटचा प्रश्न आहे.
बातमीत नेमकं काय म्हटलंय?
अजित पवार 35 ते 40 आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन्याच्या बेतात आहेत. मात्र हे सारं शरद पवारांच्या आशीर्वादानं व्हावं, असा त्यांचा आग्रह आहे. जेणेकरुन पहाटेच्या 80 तासांच्या सरकारसारखी नामुष्की पुन्हा ओढवू नये. अजित पवार आणि भाजपच्या सरकारसाठी प्रफुल्ल पटेल सूत्र हलवतायत. या बातमीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल भाजपसोबत सत्तेच्या बाजूनं आहेत, असं छापून आलं. विशेष म्हणजे आज जेव्हा शरद पवारांनी राजीनामा दिला, तेव्हा तो योग्यच आहे, अशी भूमिका योगायोगानं याच दोन नेत्यांनी मांडली.
शरद पवारांनी निवडणुका तोंडावर असताना राजीनामा का दिला?
जे शरद पवार काल-परवापर्यंत दिल्लीत विरोधकांची मोट बांधत होते, जे पवार विरोधकांमधले मतभेद मिटवण्यासाठी पुढाकार घेत होते, जे पवार अजून लई जणांना घरी पाठवायचं म्हणत होते, त्याच पवारांनी निवडणुका तोंडावर असताना राजीनामा का दिला? हा सुद्दा मोठा प्रश्न आहे.
आजवर बहुतांश पक्षाध्यक्षांनी जे राजीनामे दिले आहेत, ते निवडणुकांच्या निकालानंतर दिले आहेत. सध्याच्या महाराष्ट्र सरकारवर निकालाची टांगती तलवार आहे. कोणत्याही क्षणी महापालिका लागू शकतात, 11 महिन्यांवर लोकसभा आहेत, मात्र अशावेळी प्रत्येक संधी हेरणाऱ्या पवारांसारख्या चाणाक्ष नेत्यानं राजीनामा द्यावं, याबद्दल अनेकांना अफ्रूप वाटतंय.
शरद पवार यांच्या राजीनाम्याचा नेमका अर्थ काय?
गेल्या दिवसात ज्या नव्या सत्ताकारणांच्या गुप्त बैठका कानावर पडल्या, त्याला उत्तर म्हणून हे शक्तीचं जाहीर प्रदर्शन आहे का? दबावतंत्र विरुद्ध ही एकजूट आहे की मग पक्षातच कोण बलवान हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय? जर इतक्या मोठ्या निर्णयाची कल्पना राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नव्हती, तर मग भाजप नेते कोणत्या भाकिताकडे बोट दाखवत होते?
दरम्यान कुटुंब असो, कंपनी असो, पक्ष असो वा देश, त्यांचे धुरीण बदलले की धोरणंही बदलतात हे आजवरचा इतिहास सांगतो. जर राजीनामा सर्वमान्य झाला तर राष्ट्रवादी त्याच परंपरेची पाईक होईल की त्याला अपवाद ठरेल? हे पाहणं महत्वाचं आहे.