‘या’ गावात संध्याकाळी रडायला बंदी आहे. कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल
कोकणात राहणारे अनेक स्थानिक ग्रामस्थ आजही आपल्या जुन्या रूढी प्रथा आणि परंपरा जपून आहेत. तिथे जी काही श्रद्धा स्थाने आहेत त्यांना मानून त्यांची पूजा अर्चा करत वर्षानुवर्षाचे रिवाज पाळत आहेत.

सिंधुदुर्ग : कोकणाला निसर्गाने भरभरून सौंदर्याचे दिले आहे. हिरवीगार भाताची शेती, नारळी पोफळीच्या बागा, लांबच लांब समुद्र किनारे, हापूस आंबे, करवंदे, जांभळे, काजू, कोकम ही इथली वैशिष्ठय. मात्र, यासोबतच कोकणातील काही गूढ भागही प्रसिद्ध आहे. गावागावात असणारे निरनिराळे रीतीरिवाज, मग त्यानुसार सांगितल्या जाणाऱ्या जादू टोणे, भुतांच्या गोष्टी यामुळे कोकणला रहस्यतेची आणखी एक दुसरी किनार आहे. याच रहस्यतेच्या मालिकेत आणखी एका गावाची नोंद आहे. हे गाव आपल्या अनोख्या करणीमुळे प्रसिद्ध आहे.
कोकणात राहणारे अनेक स्थानिक ग्रामस्थ आजही आपल्या जुन्या रूढी प्रथा आणि परंपरा जपून आहेत. तिथे जी काही श्रद्धा स्थाने आहेत त्यांना मानून त्यांची पूजा अर्चा करत वर्षानुवर्षाचे रिवाज पाळत आहेत. त्यामुळे त्यांच्या पिढ्यानपिढ्या सुखाने नांदतात, अशी या ग्रामस्थांची भावना आहे.



भांडणे, रडारड झाल्यास ग्रामदैवतेचा कोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रावणगावही अशाच काही वेगळ्या चालीरीती जपत आपले वैशिष्ठय टिकवून आहे. संध्याकाळ झाली की या गावात रडायला, मोठ्या आवाजात बोलायला बंदी आहे. जे काही रडायचे, मोठ्याने बोलायचे असेल ते फक्त आपल्या घरातच बोलायचे. चुकुनही संध्याकाळी गावात भांडणे, रडारड झाल्यास ग्रामदैवतेचा कोप होतो असे येथील ग्रामस्थ सांगतात.
श्री क्षेत्रपाल हा गावचा ग्रामदैवत आहे. त्याला आपल्या सीमेमध्ये संध्याकाळी कोणीही रडलेले चालत नाही. इतकेच नाही तर गावात कोणत्याही प्रकारचा रक्तपात त्याला मान्य नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ पूर्णतः शाकाहारी आहेत. त्यांना काही करायचे असेल तर ते श्री क्षेत्रपाल याच्या हद्दीबाहेर करावे लागते.
नवसाला पावणारा गणपती
श्री क्षेत्रपाल सोबतच या गावात एक स्वयंभू उजव्या सोंडेच्या गणपतीचे मंदिर आहे. पाषाणात कोरलेली ही मूर्ती झाडीत सापडली. तिथे ग्रामस्थांनी मंदिर बांधले. मंदिराच्या परिसरात दगड रचून एक मोठी दीपमाळ बांधली आहे. हा गणपती नवसाला पावतो असे ग्रामस्थ सांगतात. गणपती मंदिराजवळ असलेल्या गुहा हे ही एक गूढ आहे. या गुहा अत्यंत अरुंद असून आजवर त्यात जाण्याचे कुणाचेही धाडस झाले नाही.
ऐतिहासिक श्रावण तळे
श्री क्षेत्रपालाच्या हद्दीत एक तलाव आहे. रामायणातील राजा दशरथ आणि श्रावण बाळ यांच्यातील शिकारीचा प्रसंग याच तळ्यात घडला होता अशी आख्यायिका आहे. या तळ्याला श्रावण तळे म्हणतात. असे सांगण्यात येते कि या तलावातील पाण्यात भात शिजवला तर रक्तासारखा लाल होतो.
परंतु, या तलावाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की पावसाळयात कितीही पाऊस पडला तरी हा तलाव पाणी भरून वाहत नाही. पण, उन्हाळ्यात मात्र या तलावात पाणीच पाणी साठते ते इतके असते की त्याचे पाणी रस्त्यावर येते. याच पाण्यातून ग्रामस्थ उन्हाळी पिके मात्र घेतात.