LadKi Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हफ्ता कधी? सर्वात मोठी बातमी समोर
राज्यातील गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.
राज्यातील गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. या योजनेची घोषणा राज्य सरकारकडून अंतरीम अर्थसंकल्पात करण्यात आली होती. ज्या महिलांनी या योजनेचे अर्ज भरले त्यांना आतापर्यंत दर महिन्याला या योजनेचा लाभ मिळाला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये अॅडव्हांस जमा करण्यात आले होते. मात्र आता निवडणूक आयोगाकडून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आल्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं उत्तर आता समोर आलं आहे.
दोन दिवसांपूर्वी जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये महायुतीच्या मेळाव्यात बोलताना याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. तसेच त्यांनी लाडक्या बहीण योजनेवरून विरोधकांना देखील जोरदार टोला लगावला आहे. कोणही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही. सावत्र भावांनी या योजनेत खोडा घातला. त्यांना जोडा दाखवा असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार , आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हफ्ता बहिणींना मिळेल.
दरम्यान काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी निवडणूक आचारसंहिता लागू असतानाही राजकीय लाभासाठी सार्वजनिक प्रसार माध्यमातून खोटी माहिती देऊन राज्य सरकारविरोधात रोष निर्माण करण्यासाठी लोकांची दिशाभूल केली, असा आरोप भाजपा मुंबई महिला मोर्चा व सोशल मीडिया सेलकडून करण्यात आला आहे. याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी करावाई करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.