Maratha Reservation : कोण आहे मनोज जरांगे पाटील, हॉटेलमध्ये काम केले, मराठा आंदोलनासाठी जमीन विकली
Maratha Reservation : मराठा समाजातील आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील यांचे नाव पुढे आले. त्यांनी थंड झालेले हे आंदोलन राज्यभर पसरवले. आंदोलनासाठी स्वत:ची जमीन विकणारे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण?
जालना | 14 ऑक्टोंबर 2023 : मराठा समाजाचे आंदोलन पुन्हा एकदा पेटले. या आंदोलनामुळे महाराष्ट्राचे लक्ष जालना शहराकडे गेले. गेल्या काही दिवसांपासून जालना मराठा आंदोलनाचे केंद्र झाले आहे. मराठा आंदोलनास पुन्हा जिवंत करणारे मराठवाड्याला परिचित असणारे नाव आता महाराष्ट्रभर पसरले. ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. कधीकाळी उपजिविकेसाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम केले. मराठा आंदोलनासाठी त्यांनी स्वत:ची जमीन विकली. आता हे नाव राज्यातील घराघरापर्यंत गेले आहे.
मनोज जरांगे पाटील आहेत कुठले
मनोज जरांगे पाटील मुळचे बीड जिल्ह्यातील रहिवाशी. मोतोरी हे त्यांचे गाव. काही वर्षांपूर्वी त्यांनी बीडमधून जालनाकडे आपला मुक्कम हलवला. जालना जवळ असलेल्या अंबडमधील अंकुशनगरात ते स्थायिक झाले. त्यांच्या घरची परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे उपजिविकेसाठी त्यांनी एकेकाळी हॉटेलमध्ये काम केले. पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते समाजात जाऊ लागले. चर्चा करु लागले. मग मराठा आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च्या जमीन विकली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कित्येक मोर्चे काढले. आमरण उपोषणे केली. रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण मराठवाड्यात पसरले.
लाठीचार्जनंतर राज्याचे लक्ष वेधले
मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरु केले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी होती. तीन दिवस त्यांच्या उपोषणाकडे राज्याचे लक्ष गेले नाही. परंतु १ सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर झाला. यावेळी प्रचंड गोंधळ झाला. त्यावेळी लाठीचार्ज पोलिसांनी केला. अनेक जण जखमी झाले आणि राज्याचे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर सभा घेतल्या. या सभानंतर १४ सप्टेंबर रोजी अंतरवली सराटीत सभेचं आयोजन केले.
कधीकाळी काँग्रेसमध्ये आता समाजाचे नेतृत्व
मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे काम केले होते. परंतु राजकीय वातावरणात ते रमले नाही. मग त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. संघटनेचे काम वेगाने केले. कोपर्डी अत्याचार प्रकरणात आरोपीवर हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांच्या शिवबा संघटनेवर आरोप झाले होते.