सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार कोण? पंकजा मुंडे यांचे पक्षात स्वागत, काय म्हणाला हा नेता?
सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवेल असा उमेदवार भाजपकडे नाही. त्यामुळे पवार घरातील नाव पुढे करण्यात येत आहे. खासदार सुप्रिया ताई यांच्या विरोधामध्ये नेमकं कोण रिंगणात उतरतोय हे पहावं लागेल असा टोला लगावला.
मुंबई : 27 सप्टेंबर 2023 | भाजप नेत्या पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांच्याबाबत भाजपने सातत्याने दुजाभाव केल्याचं चित्र आजच नाही तर 2014 पासून बघत आहोत. राज्यातल्या एका मोठ्या नेत्यांच्या त्या कन्या आहेत, बहुजन वर्गातल्या आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आहे. पण, भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना किती स्थान दिलं जातं. महिलांना किती प्रोत्साहन दिले जाते हे आपण पाहतच आहोत. त्यामुळे पंकज मुंडे काही भूमिका घेत असतील तर त्याचा नक्कीच विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे. अन्यथा, पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत असतील तर त्यांचं स्वागत करू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते यांनी दिलीय. दरम्यान, वैजनाथ कारखान्यावर झालेल्या कारवाईवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पंकजा मुंडे यांची बाजू घेतली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी निवडणुक लढविणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र, खासदार सुप्रिया ताई यांच्या विरोधामध्ये नेमकं कोण रिंगणात उतरतोय हे पहावं लागेल असा टोला लगावला.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात देण्यासाठी भाजपकडे कोणताही चेहरा नाही. त्यामुळेच जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी पवार घरातीलच एका व्यक्तीचे नाव पुढे करत आहेत अशी टीका तपासे यांनी केली.
खासदार सुप्रियाताई तीन वेळी बारामतीमधून खासदार झाल्या आहेत. त्यांना आठ वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. प्रादेशिक प्रश्न असतील, राष्ट्रीय प्रश्न असतील, आंतरराष्ट्रीय प्रश्न असतील या सर्व प्रश्नांवर खासदार सुप्रियाताईंनी चांगली पद्धतीने त्यांची भूमिका संसदेमध्ये मांडली असे ते म्हणाले.
खासदार सुप्रियाताई यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला काम करणे कठीण होत आहे. त्यामुळेच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी घरातल्या एका व्यक्तीचे नाव उपस्थित करत आहेत. परंतु, सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधामध्ये उमेदवार देण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडे चेहरा नाही हे स्पष्ट झालं असा खरमरीत टोला त्यांनी लगावला.