कोण आहे हिंदुस्थानी भाऊ, ज्याच्या आवाहनावर मुंबईत शेकडो विद्यार्थ्यांनी ठाकरे सरकारला घामटा फोडला?
विद्यार्थ्यांचं आदोलन पेटण्यापूर्वी काही वेळ आधीच तिथे हिंदुस्तानी भाऊ आलेला मात्र त्याला तिथे न थांबू देता पोलिसांनी तिथून बाहेर काढलं त्यानंतरच हे आंदोलन आणखी आक्रमक झालं.
मुंबई : मुंबईत आज अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर (Student Protest) उतरले. त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराला घेराव घातला. गर्दी एवढी जास्त होती की, पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मुंबईसारख्या ठिकाणी एवढी गर्दी तीही विद्यार्थ्यांची, त्यामुळे ठाकरे सरकारला घामटा फुटला नसता तरच नवल. पण मग हे सर्व विद्यार्थी आले कुठून, त्यांचं नेतृत्व नेमकं कुणी केलं? कुणाच्या आवहानावर ते जमा झाले असे अनेक प्रश्न पोलीसांना पडले, सरकारलाही पडले. आणि मग त्यातून हिंदुस्थानी भाऊचं (Hindustani Bhau Video) नाव समोर आलं. कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ, त्याचं नेमकं नाव काय, तो करतो काय, कुठल्या पक्षाशी तो संबंधीत आहे असे अनेक प्रश्न फक्त सरकारच नाही तर मीडियालाही शोधावं लागलं. आणि त्याचाच शोध आम्हीही घेतला. विद्यार्थ्यांचं आदोलन पेटण्यापूर्वी काही वेळ आधीच तिथे हिंदुस्तानी भाऊ आलेला. मात्र त्याला तिथे न थांबू देता पोलिसांनी तिथून बाहेर काढलं. त्यानंतरच हे आंदोलन आणखी आक्रमक झालं. या हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी या ठिकाणाहून काढल्यानंतर हिंदुस्तानी भाऊने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, तो व्हिडिओ आता चांगलाच वायरल होत आहे.
कोण आहे हिंदुस्तानी भाऊ?
या हिंदुस्तानी भाऊचे नाव विकास पाठक असे आहे. या हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप आहे. हिंदुस्तानी भाऊ बिग बॉसच्या सीझन 13 मध्येही दिसून आला होता. त्याआधी सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ आहेत. ज्यामध्ये तो अश्लाघ्य भाषा वापरण्यासाठी फेमस आहे. शिक्षमंत्र्यांनी माझं म्हणनं ऐकून घेतलं नाही असा आरोप विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊने केला आहे. यावेळी टिव्ही 9 शी बोलताना विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊला भेटण्यासाठी वेळ देईन असेही आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
हिंदुस्तानी भाऊचा हा व्हिडिओ व्हायरल
आंदोलनानंतर काय म्हणाला हिंदुस्तानी भाऊ?
त्यात तो आज तिन महिने झाले हे विद्यार्थी वर्षा गायकवाड यांना सांगत आहेत. त्यांचा आवाज विद्यार्थ्यांनी ऐकला नाही. त्या विद्यार्थ्यांनी आज माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला, तर मी आज वाईट झालो का? कोरोना महामारी संपत नाही तोपर्यंत परीक्षा पुढे ढकला. तुम्ही सर्व बैठका ऑनलाईन घेता, मग विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन का. हे विद्यार्थी देशाचं भविष्य आहेत. परीक्षा नको असं मी म्हणालोच नाही. फक्त ती परीक्षा पुढे ढकला. तसेच तीन महिन्यापासून विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत. मी आज सरकारला आवाहन करतोय की परीक्षा पुढे ढकला. खेडेगावात आज हजारो विद्यार्थी आहेत. त्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेताच आलं नाही. लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना आवाहन केलं होतं. आता विद्यार्थ्यांनी मला आवाहन केलं की आमच्यासाठी उभे राहा म्हणून मी आज त्यांच्यासाठी उभा आहे. अशी प्रतिक्रिया त्याने आंदोलननंतर दिली आहे.