Ajit Pawar : 2024 साली कोण पंतप्रधान होणार? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितल्याने राजकीय पक्षांमध्ये एकच खळबळ
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात वेगाने घडामोडी घडत आहे. उपमुख्यमंत्रिपदी विराजमान असलेल्या अजित पवार यांनी 2024 साली पंतप्रधानपदी कोण बसेल हे थेट सांगितल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई : राज्यात राजकिय घडामोडींना वेग आला असून आता राजकारणाचा पुढचा टप्पा सुरु झाला आहे. अजित पवार यांनी भाजपा आणि शिवसेनेसोबत वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन गट पडले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत 9 आमदारांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार आणि शरद पवार या दोन गटात आमदार आणि कार्यकर्त्यांची विभागणी झाली आहे. दोन्ही नेते आपली ताकद पणाला लावून शक्तिप्रदर्शन करत आहेत. मुंबईतील वांद्रे येथे अजित पवार यांनी सभा घेत शरद पवार यांच्यासह सगळी जुनी प्रकरणं बाहेर काढली. इतकंच काय तर 2024 साली पंतप्रधान कोण होणार याबाबतही अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
“आमच्या अनेक बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये पहिल्या रांगेतील अनेक आमदार नेते उपस्थित असायचे.तेव्हा आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की, 2024 सालातही नरेंद्र मोदी यांचंच सरकार येणार. मी खोटं नाही बोलणार. मला खोटं बोलून काहीही मिळवायचं नाही.” असं अजित पवार यांनी सभेत सांगितलं.
पाटण्यात विरोधकांच्या बैठकीत काय झालं?
पाटण्याच्या सभेत भाजपा विरोधक असलेल्या पक्षाचे नेते एकत्र आले होते. या सभेत नेमकं काय झालं यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. “केजरीवाल यांच्या ताब्यात दिल्ली आणि पंजाब ही दोन राज्य आहेत. दोन्ही मुख्यमंत्री तिथे बसले होते. पण काहीतरी फिस्कटलं आणि ते दोन्ही नेते तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी केलेलं ट्वीट सर्वांनाच माहिती आहे. झालं तिथेच फुसका बार निघाला.”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
“स्टॅलिन तेथे उपस्थित होते जेवले आणि पत्रकार परिषदेलाही थांबले नाहीत. असं सर्वांचं कडबोलं घेऊन देश चालू शकत नाही. एकदा बघितलं आहे जनता पक्षाच्या काळामध्ये..देश नाही चालला.”, असंही अजित पवार यांनी पुढे सांगितलं.