महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलने उद्धव ठाकरेंचं वाढवलं टेन्शन
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या संस्थेचे एक्झिट पोलने महाविकासआघाडीचं टेन्शन वाढवलं आहे. आज जाहीर झालेल्या टुडे चाणक्या एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढणार आहे. निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्याआधी बैठका सुरु झाल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी वेगवेगळे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण जवळपास सर्वच सर्वेक्षणांमध्ये भाजप महायुतीला सत्ता मिळताना दिसत आहे. टुडे चाणक्य सर्वेक्षणात राज्याची सत्ता पुन्हा महायुतीच्या हाती जाऊ शकते, असे स्पष्ट संकेत मिळते आहेत. टुडेज चाणक्यच्या मते, महायुतीला तब्बल 175 जागा मिळतील, तर विरोधी महाविकास आघाडीला 100 जागा मिळू शकतात. असा अंदाज आहे तर इतर पक्षांना जवळपास 13 जागा मिळण्याची शक्यता आहे.
सर्वेक्षणात जातीच्या आधारावर देखील कल समोर आला आहे. मराठा समाजातील 48% मते महायुतीच्या बाजूने आहेत, तर 38% मते हे महाविकासआघाडीच्या बाजुने असल्याचे समोर आले आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या मोठ्या वर्गानेही महायुतीकडे झुकते माप दिले असून, तेथे ४९% पेक्षा जास्त मते महायुतीच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. मुस्लीम समुदायाचा एक मोठा भाग महाविकासआघाडीच्या पाठीशी उभा असल्याचे दिसतेय, जेथे महाविकासआघाडीला 75% मते मिळण्याची अपेक्षा आहे. ओबीसी मतदारांनीही महायुतीला ५० टक्के पाठिंबा दिला आहे.
राजकीय समीकरण आणि प्रभाव
सर्वेक्षणाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात महायुतीची मजबूत पकड दिसत आहे. ओबीसी, एसटी आणि मराठा समाजातील लोकांनी महायुतीच्या बाजुने कौल दिला आहे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या चिंता वाढल्या आहेत. पण मुस्लीम मतांचा मोठा भाग महाविकासआघाडीच्या बाजुने दिसत आहे, ज्यामुळे काही प्रमाणात त्याच्या जागा येताना दिसत आहेत.
राजकीय विश्लेषण काय सांगतं
महाराष्ट्राची निवडणूक ही देशाच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकू शकते. हा निकाल राष्ट्रीय राजकारणासाठीही महत्त्वाचा आहे. एक्झिट पोलचे निकाल योग्य ठरले तर हा भाजपचा मोठा विजय असेल आणि शिवसेना शिंदे गटाला आणखी बळकट करेल. पण हा पराभव महाविकासआघाडीसाठी मोठे आव्हान ठरू शकतो. मात्र, आता 23 नोव्हेंबरला लागणाऱ्या अधिकृत निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, तेच महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने वळतात हे ठरवणार आहेत.