Sangli Suicide: हसतं खेळतं 9 जणांचं कुटुंब एका रात्रीतून होत्याचं नव्हतं झालं, का केली सामूहिक आत्महत्या, गुप्तधनाची लालसा की आर्थिक विवंचना? वाचा चार संभाव्य कारणे
चांगल्या हसत्या-खेळत्या कुटुंबाने असा निर्णय का घेतला असावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही भावांच्या घरांशेजारी राहणारे या घटनेनंतर पूर्णपणे धक्क्यात आहेत. कारणांची कुजबूज सुरु आहे, पण ठोस कुणीच सांगत नाहीये. संपूर्ण कुटुंबच नाहीसं झाल्याने पोलीसही तपास कोणत्या दिशेने करायचा, याबाबत थोडे संभ्रमात आहेत. काय असू शकतात कारणे, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न..
सांगली – चांगल्या सुशिक्षित घरातील दोन भावांच्या 9 जणांच्या कुटुंबानी ( family suicide)एका रात्रीतून आत्महत्या करत आयुष्याचा शेवट केला. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळा (Mhaisala, Sangli)येथील या प्रकारानं अनेक जण अचंबित झाले आहेत. दोन भावांचा हा संसार एकदम काळाच्या पडद्याआड गेला. यातला एक भाऊ डॉक्टर होता तर दुसरा शिक्षक (doctor and teacher)होता. हे दोघेही भाऊ वेगवेगळे राहत होते. या दोघांचीही आई डॉक्टर असलेल्या भावाकडे मुक्कामाला होती, त्या माऊलीनेही मुला, नातवंडांसोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रविवारी रात्री या दोन्ही भावांनी त्यांच्या त्यांच्या घरात कुटुंबियांसोबत विषप्राशन केलं आणि आयुष्य संपवलं. विशेष म्हणजे यातील एका भावाचा मुलगा आत्महत्या केली तेव्हा, काकाच्या घरी होता. या दोन्ही कुटुंबांनी अचानक हा निर्णय का घेतला असावा, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यांचे काही आनंद साजरा करतानाचे फोटोही समोर आले आहेत. चांगल्या हसत्या-खेळत्या कुटुंबाने असा निर्णय का घेतला असावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही भावांच्या घरांशेजारी राहणारे या घटनेनंतर पूर्णपणे धक्क्यात आहेत. कारणांची कुजबूज सुरु आहे, पण ठोस कुणीच सांगत नाहीये. संपूर्ण कुटुंबच नाहीसं झाल्याने पोलीसही तपास कोणत्या दिशेने करायचा, याबाबत थोडे संभ्रमात आहेत. काय असू शकतात कारणे, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न..
1.नऊ जणांची हत्या झाल्याची शक्यता?
या नऊही जणांची कुठीतरी ठरवून हत्या केल्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेत राजधानी हॉटेलजवळ असलेल्या डॉ माणिक यल्लप्पा वनमोरे यांच्या घरात, माणिक, पत्नी रेखा, आई आकताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा ,मुलगा आदित्य आणि पुतण्या शुभम यांचे मृतदेह सापडले आहेत. तर दुसरा भाऊ पोपट वनमोरे यांच्या घरात त्यांची पत्नी संगीता, मुलगी अर्चना यांचे मृतदेह सापडले आहेत. आता विषप्रयोग केल्याचे सांगितले जात असले, तरी हा प्रयोग दोन्ही ठिकाणी एकदम कुणी घडवून आणला असल्याची शक्यता नाकारता येत नाही, आता या दिशेने पोलीस तपास करण्याची शक्यता आहे. या कुटुंबाचे कुणाशी शत्रूत्व होते का, काही मालमत्तेचा वाद होता का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
2.आर्थिक विवंचनेतून संपवले आयुष्य?
आर्थिक विवंचनेतून या ९ जणांच्या परिवाराने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला आहे, असे प्राथमिक पातळीवर सांगितले जाते आहे. मात्र त्यांचे काही फोटो पाहिल्यास, त्यांची अवस्था विपन्न असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. कोणत्या आर्थिक व्यवहारात नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असेल का, याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे. ही दोन्हीही कुटुंब प्राथमिक पातळीवर सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय दिसत आहेत. आर्थिक विंवचनेतून त्यांनी एवढा टोकाचा मार्ग स्वीकारला असेल का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येते आहे. आता पोलिसांच्या तपासात यातील सत्य समोर येईल. पण या अंगलनेही या प्रकरणाचा तपास होणार हे नक्की
3.गुप्तधनाच्या लालसेतून प्रकार?
गुप्तधनाच्या लालसेतून आलेला कर्जबाजारीपणा हेही या आत्महत्यांमागचे एक कारण असल्याची चर्चा होते आहे. गुप्तधनाच्या लालसेतून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पातळ्यांवर गुन्हे घडत असल्याचे नेहमीच प्रकार घडत असतात. अशा स्थितीत अशा सुशिक्षित घरात असा प्रकार घडला असावा का, याबाबत शंका व्यक्त होते आहे. या दोन्ही कुटुंबातील मुले ही चांगल्या जाणत्या वयातील होती, त्यांनीही हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न का केला नसावा, असा प्रश्नही उपस्थित होतोय. सध्यातरी पोलीस या अँगलनेही या प्रकरणाचा तपास करतील, अशी शक्यता आहे.
4.अंधश्रद्धेतून घडला असेल प्रकार?
सामूहिक आत्महत्या घडण्याचे तेही अशा कौटुंबिक आत्महत्या घडण्यामागे अनेकदा अंधश्रद्धा हे कारण असते. दिल्लीतही बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरण अशाच अंधश्रद्धेतून झाल होते. या घटनेत ११ जणांनी सामूहिक आत्महत्या केली होती. कुटुंबातील एका भावाच्या अंगात वडिलांचा आत्मा येतो, आणि तो आत्मा लिहून दिलेल्या आज्ञा पाळण्यातून या आत्महत्या घडल्या होत्या. असा काही प्रकार तर या सामूहिक आत्महत्या प्रकारात नाही ना, या दिशेनेही पोलीस तपास करण्याची शक्यता आहे.
तरुण मुलांचाही समावेश हळहळ वाटणारा
या शक्यतांच्या व्यतिरिक्त कुणाच्या धमकी, दबावानेही हा निर्णय घेण्याची वेळ या कुटुंबावर आली का, या दिशेनेही तपास होऊ शकतो. या घरातील सदस्यांचे काही फोटो या आत्महत्या प्रकरणानंतर समोर आले आहेत. यातील काही मुले ही तरुणाईच्या उंबरठ्यावर उभी होती. त्यांनीही या सगळ्यात कसा सहभाग घेतला, प्रश्न उपस्थित केले नाहीत का, विरोध केला नसेल का, याची सगळ्याची उत्तरे आता पोलीस तपासात समोर येणार आहेत. मात्र एक हसते खेळते कुटुंब एका रात्रीतून होत्याचे नव्हते झाले. हे मात्र वास्तव आहे. याची हळहळ परिसरात राहणाऱ्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नेहमीच सल देणारी ठरेल.