Rohit Pawar | रोहित पवार यांना ईडीचं समन्स का? कारवाईमागे नेमकं कारण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. रोहित पवार यांना येत्या बुधवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई | 19 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. ईडीने 15 दिवसांपूर्वीच रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी धाड टाकली होती. यामध्ये पुणे, बारामती येथील बारामती अॅग्रोचे कार्यालय तसेच छत्रपती संभाजीनगर येथील कारखान्याचादेखील समावेश असल्याची माहिती समोर आली होती. रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने ही कारवाई केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर टीका केली होती. त्यांनी या कारवाईमागे अजित पवार गटावर आरोप केला होता. अजित पवार मित्र मंडळ दिल्लीला जावून आल्यानंतर ही कारवाई झाल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. विशेष म्हणजे या कारवाईनंतर रोहित पवार यांना आता ईडीने समन्स बजावल्याची बातमी समोर आली आहे.
ईडीने रोहित पवार यांना येत्या बुधवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. त्यानंतर रोहित पवार ईडी चौकशीला सामोरं जातात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. ईडीने रोहित पवार यांना नेमकं कोणत्या कारणास्तव समन्स बजावलं आहे? असा देखील प्रश्न अनेकांना पडला आहे. रोहित पवार यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र शिखर बँकेकडून कन्नड सहकारी साखर कारखान्याप्रकरणी झालेल्या लिलावा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेकडून औरंगाबादमधील कन्नड सहकारी साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोने या कारखान्याची खरेदी केली होती. बारामती अॅग्रोने 50 कोटी रुपयांत कन्नड सहकारी साखर कारखान्याची बँक लिलावातून खरेदी केली होती. पण या लिलावात सहभागी असलेल्या कंपनी बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग कार्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्यांमध्ये एकमेकांत झालेले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याच प्रकरणावर बोट ठेवत रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या लिलावात फेरफार करुन कन्नड सहकारी साखर कारखाना अवघ्या 50 कोटी रुपयात खरेदी केला होता”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. तसेच या प्रकरणी ईडीने चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.