बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी गावाला बंदी का? कोणता कायदा आहे?; शरद पवार संतापले
शरद पवार यांनी निवडणूक निकालावरील आकडेवारीवरुन शंका उपस्थित केली आहे. या शिवाय त्यांनी मारकडवाडीतील लोकांकडून बॅलेट पेपरवर मतदान घेत असताना प्रशासनाने केलेल्या कारवाईवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. काय म्हणाले शरद पवार सविस्तर जाणून घ्या.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांनी आज मारकडवाडीतील लोकांकडून बॅलेट पेपरवर मतदान घेत असताना केलेल्या कारवाईच्या विरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित केला. शरद पवार म्हणाले की, ‘मी उद्या मारकडवाडीत जातोय. त्या लोकांशी बोलणार आहे. उत्तम जानकर काय आणि या ठिकाणचे दोन्ही उमेदवार पाहा. त्यांच्या सभा पाहिल्या. गेल्या ४० ते ५० वर्षापासून मी सभा करतोय. यांच्या सभा पाहिल्यावर निकाल काय लागणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. वातावरण अनुकूल होतं. पण निकाल अनुकूल नाही. पण जोपर्यंत अधिकृत माहिती नाही तोपर्यंत बोलणार नाही.’
मारकडवाडीतील लोकांचं मत जाणून घेणार
‘राहुल गांधी येणार असल्याबाबत वाचनात आलं. पण नक्की माहीत नाही. ते येत आहेत असं सांगितलं जात आहे. ईव्हीएमवर संशय व्यक्त केला नाही. माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही. मी फक्त आकडेवारी सांगितली आहे. निवडणूक होऊन गेली होती. गावच्या लोकांनी एक पद्धत अवलंबली. जुन्या पद्धतीने मतदान करावं हे त्यांनी ठरवलं. बॅलेट पेपरवर त्यांना बंदी का? कोणता कायदा आहे. त्या ठिकाणी १४४ कलम लावलं? त्याचं कारण काय. मला आश्चर्य वाटलं. म्हणून मी म्हटलं तिकडे जाऊनच येऊ. लोकांचं मत जाणून घेऊ. अधिकाऱ्यांशी बोलू. जयंत पाटील आणि इतर काही लोकं माझ्यासोबत येणार आहेत.’ अशी माहिती त्यांनी दिली.
एकत्र लढणार
‘आम्ही एकत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र जाणार आहोत. निवडणुकीत अप आणि डाऊन येत असतो. त्यामुळे निराश व्हायचं नसतं. १४ निवडणुका पाहिल्या. कधी पराभव पाहिला नाही या निवडणुकीत पराभव झाला. पण तरीही निराश व्हायचं नाही. लोकांमध्ये जायचं असतं. लोकांमध्ये गेलं पाहिजे.’ असं ही शरद पवार म्हणाले.
मविआतून सपा बाहेर
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आपण महाविकासआघाडीतून बाहेर पडत असल्याचं सांगितलं. त्यांनी ठाकरे गटावर हिंदुत्वाचा अंजेडा राबवत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, समाजवादी पार्टीबाबत माहिती घेतो. सपाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांचा आग्रह एकत्र राहण्याचा आहे.