उदयनराजे यांना तिकीट, नारायण राणे अजून वेटिंगवर; धाकधूक वाढली
महायुतीत सध्या ट्विस्ट आलाय. कारण तीन जागांकडे महाराष्ट्राचं सर्वाधिक लक्ष आहे. नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि सातारा लोकसभा मतदारसंघ. यापैकी सातारा मतदारसंघाचा उमेदवार आज जाहीर झालाय. खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपकडून साताऱ्याची उमेदवारी जाहीर झालीय. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अद्याप उमेदवारी न जाहीर झाल्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबतची धाकधूक वाढली आहे.
महायुतीत काही जागांवरचा तिढा काही सुटताना दिसत नाही. नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा या मतदारसंघावर पक्का दावा आहे. पण भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचादेखील या मतदारसंघावर दावा आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाही. या जागेसोबतच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटत नाहीय. कारण शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघावर दावा केला जातोय. मंत्री उदय सामंत यांनी आधीच दावा सांगितलाय. त्यांचे बंधू किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना उधाण आलं. विशेष म्हणजे भाजपकडून आज खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे याबाबतच्या चर्चांना जास्त उधाण आलं आहे.
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी कधी जाहीर होईल? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर आमचाही दावा आहे, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे एक दिवस थांबा. राम नवमीला जल्लोष साजरा करु, असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. पण तरीही नारायण राणे यांचं नाव अजूनही वेटिंगवर असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत धाकधूक वाढल्याची चर्चा आहे.
उदय सामंत नेमकं काय म्हणाले?
“मी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत भूमिका वारंवार मांडलेली आहे. शिवसेनेने दावा केलेलाा आहे, गेल्या निवडणुकीत शिवसेनेने ही जागा लढली होती. आम्ही 1 लाख 75 हजार मतांनी जिंकलो होतो. दुर्देवाने त्यावेळी निवडून आलेले खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेले नाहीत. कोकण आणि धनुष्यबाण यांचं वेगळं असं अलौकिक नातं आहे. त्यामुळे ती जागा शिवसेनेला मिळावी, ही आमची सर्वांची मागणी आहे. ती शिवसेनेला मिळाली तर आमचा उमेदवार एकमताने ठरलेला आहे”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.
नितेश राणे काय म्हणाले?
भाजप आमदार नितेश राणे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फार भाष्य करणं टाळलं. “तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज किंवा उद्या मिळणार. उद्या जय श्रीरामचा नारा घुमणार. जल्लोष साजरा होणार”, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात पक्षीय बलाबल काय, इतिहास काय?
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. राजापूर आणि कुडाळ मतदारसंघात ठाकरेंचे आमदार आहेत. रत्नागिरी आणि सावंतवाडीत शिंदेंचे आमदार आहेत. कणकवलीत भाजपचा, तर चिपळूणमध्ये अजित पवार गटाचा आमदार आहे. 2019च्या लोकसभेत शिवसेनेच्या विनायक राऊतांनी अपक्ष लढणाऱ्या निलेश राणेंचा पराभव केला होता.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत विनायक राऊतांना निलेश राणेंनी आव्हान दिलं होतं. विनायक राऊतांना 4,58,022 तर निलेश राणेंना 2,79,700 मतं पडली होती. राऊतांनी 1 लाख 78 हजार 322 मतांनी राणेंचा पराभव केला होता.