Supriya Sule | बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार सामना होणार? प्रथमच पवार कुटुंबातील व्यक्तीने दिलं उत्तर
Supriya Sule | बारामतीमध्ये काय होणार? याकडे राज्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. पण अजित पवार यांच्या बंडाचा बारामतीवर परिणाम होणं स्वाभाविक आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. शरद पवार गट विरोधी पक्षामध्ये आहे. दोन्ही बाजू आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या फुटीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. कोण, कुठल्या विधानसभा, लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार? हा एक महत्वाचा मुद्दा असेल.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील या फुटीमुळे बारामतीमध्ये काय होणार? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहेत. सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंबातूनच आव्हान मिळणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
बारामती पवार कुटुंबाचा बालेकिल्ला
सुप्रिया सुळे 2009 पासून बारामती मतदारसंघाच लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व करतायत. मागच्या 13-14 वर्षापासून त्या खासदार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. तिथून लोकसभेवर सुप्रिया सुळे आणि विधानसभेवर अजित पवार सातत्याने निवडणूक जिंकले आहेत.
रोहित पवार यांनी काय उत्तर दिलं?
पण आता पवार कुटुंबातील बंडामुळे बारामतीत काय होणार? याची सर्वसामान्यांना उत्सुक्ता आहे. आज रोहित पवार यांना पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार असा सामना होणार का? म्हणून प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार निवडणूक होणार नाही. अजितदादा तशी भूमिका घेणार नाहीत. बारामती विधानसभेवर फक्त अजितदादाच निवडून येऊ शकतात. दुसरं कुणी नाही, अजितदादा कुटूंबाच्या बाबतीत तशी भूमिका घेणार नाहीत” असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. अजित दादांविरोधात कोण निवडणूक लढवणार?
“अजित पवार यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार नाही, माझ्या कुटूंबातील कुणीही निवडणुकीला उभं रहाणार नाही, अजितदादांनी केलेल्या कामावर दादाच निवडून येणार, लोकसभेला पण कुणी कितीही प्रचार केला तरी सुप्रिया सुळे निवडून येणार” असं रोहित पवार म्हणाले.