एकनाथ शिंदे हे देवेंद्र यांचा मार्ग अवलंबणार? फडणवीस मोडीत काढणार ही समज
देवेंद्र फडणवीस हे उद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यावेळी शपथ घेताच ते महाराष्ट्रातील राजकारणातील अनेक वर्षांपासून सुरु असलेली समज मोडून काढणार आहेत. पण यासोबतच एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्रात महायुतीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स होता. मात्र त्यावर पूर्णविराम लागला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. फडणवीस हे शपथ घेताच महाराष्ट्रातील अनेक दशकांचा समज मोडीत काढणार आहे. राज्यात आजपर्यंत जो कोणी उपमुख्यमंत्री झाला तो कधीच मुख्यमंत्री होऊ शकलेला नाही. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सर्वांनाच चकित केले होते. त्याआधी ते म्हणाले होते की, मी पुन्हा येईन. त्यांच्या या वक्तव्याची विरोधकांनी बरीच खिल्ली उडवली होती. पण अखेर त्यांनी आपलं वक्तव्य खरं करुन दाखवलं.
फडणवीस असे एकमेक नेते
मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. पण उद्या जर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर ते देखील या रांगेत असे करणारे दुसरे नेते असतील. पण ते खरंच देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मार्ग अवलंबणार का असा प्रश्न आहे. कारण राजभवनात सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का याबाबत संध्याकाळी जाहीर करणार असल्याचं म्हटलं होतं. पण अजून तरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्याच वेळी मी शपथ घेणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.
अजित पवार सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे जर फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले तर ते राज्याचे 10 वे उपमुख्यमंत्री असतील. राज्यात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. अजित पवार यांनी पाच वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते 7 वर्षे 215 दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या नंतर छगन भुजबळ आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आर.आर.पाटील, त्यानंतर गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस आहेत. तसेच नाशिकराव तिरपुडे हे रामराव आदिक, सुनंदराव सोळंके, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह राज्यात उपमुख्यमंत्री राहिले आहेत. उद्या अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यात सर्वाधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे. यानंतर भाजप आणि नंतर काँग्रेस आहे.