एकनाथ शिंदे नव्या मंत्री मंडळात सहभागी होणार का? मोठी माहिती आली समोर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उद्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्या कॅबिनेटमध्ये कोणाकोणाला संधी मिळते याबाबत उत्सूकता आहे. पण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार की नाही याबाबत ही चर्चा रंगल्या आहेत. थोड्याच वेळात ते मोठी घोषणा करु शकतात.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार आहेत. आज झालेल्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकाच गाडीतून राज्यपाल राधाकृष्णन यांना भेटण्यासाठी राजभवनात पोहोचले. यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे हे उद्या शपथ घेणार की नाही हे उद्या संध्याकाळी कळवू हे विधान येताच पुन्हा एकदा खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शिवसेना नेत्यांची बैठक सुरु आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही याचा फैसला या बैठकीत होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या मंत्री मंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे बैठकीनंतर ते मोठी घोषणा करू शकतात. अशी चर्चा आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासाठी सन्माननीय पदाची मागणी करत आहे. शिवसेनेचे नेते त्यांच्यासाठी गृहमंत्रीपद मागत आहेत. पण भाजप हे खातं सोडण्यास अजून तरी तयार नाही.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला असला तरी आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये राहणार की नाही याबाबतचा सस्पेंस वाढला आहे. आज सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिंदे यांना सरकारमध्ये राहण्याची विनंती केली असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले, मी फडणवीसांचे अभिनंदन करतो. सरकारमध्ये सहभागी होणार की नाही हे संध्याकाळी सांगेन.
उद्या शपथविधी सोहळा
देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता होणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक छोटे पक्ष आणि अपक्षांनीही फडणवीसांना पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला गृहमंत्री अमित शाह आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.