राज ठाकरे शिवसेना प्रमुख होतील का? काय आहे राज्याच्या राजकारणात चर्चा
महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे एनडीएमध्ये सामील होण्याची चर्चा असतानाच मोठी राजकीय उलथापालथ होण्याची तयारी सुरू आहे. राज ठाकरेंच्या माध्यमातून भाजप महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय भूमिका बजावू शकते, असे बोलले जात आहे.
मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याची पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आपला पक्ष विलीन करू शकतात, अशी चर्चा आहे. त्यानंतर ते शिवसेनेचे अध्यक्ष होऊ शकतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर मनसे एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती, त्यानंतर मनसेने महाराष्ट्रात लोकसभेच्या तीन जागा मागितल्याचं समोर आलं होतं, मात्र अनेक दिवसांनंतरही नवीन अपडेट समोर आलेलं नाही.
राज ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष झाले तर राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. मनसे जर शिवसेनेत विलीन झाली तर शिवसेनेची ताकद वाढणार आहे. पण यावर अधिकृतपणे कोणीही बोलायला तयार नाही. मनसेप्रमुख शिवसेनेत परतले तर ते शिवसेनेचे नेते म्हणून संपूर्ण राज्यात प्रचार करतील. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रस्तावाची माहिती दिली आहे. ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांच्या हिताचा निर्णय घेतील असं गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहेत, तरीही त्यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करून शिवसेना प्रवेशाचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. एवढेच नाही तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही बाकी आहेत.
जागा वाटप प्रलंबित
काँग्रेस आणि भाजपने आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. याशिवाय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे यांना बारामतीतून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षांनी अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. महाविकास आघाडी तसेच महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. राज ठाकरे यांनी त्यांचा मुलगा अमित यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. यानंतर त्यांच्या महायुतीतील प्रवेशाबाबत अटकळ बांधली जात होती, मात्र त्यानंतर कोणतेही अधिकृत अपडेट समोर आलेले नाही. असे झाल्यास भाजपला राज ठाकरेंसोबत दीर्घकालीन भागीदारी करायची आहे, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात भाजप शिवसेनेसोबत आहे.