महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागणार? NDA पेक्षा INDIA आघाडीला जास्त फायदा, पाहा कोणाला किती जागा मिळणार?
पाच राज्यांचा सी व्होटरच्या सर्वेक्षण अहवाल समोर आला होता. यात पाचपैकी चार राज्यात भाजपने आघाडी घेतली होती. परंतु, महाराष्ट्रात मात्र काहीसे वेगळे चित्र दिसणार आहे असे या सर्वेक्षण अहवालातून समोर आलेय. तर पश्चिम बंगालमध्येही भाजपला यश मिळणे कठीण आहे असे हा अहवाल सांगत आहे.
नवी दिल्ली | २३ डिसेंबर २०२३ : देशात लोकसभा निवडणुकांचे वातावरण तयार होऊ लागले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. एप्रिल-मे महिन्यात देशभरात लोकसभेच्या निवडणुका होतील. भाजप तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे. तर, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील भारत आघाडीही आपल्या विजयाचा दावा करत आहे. दरम्यान, एक नवीन ओपिनियन पोल समोर आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रात भाजपप्रणित एनडीए आघाडीला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.
सी व्होटरचा सर्वेक्षण अहवाल नुकताच समोर आला आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल येथे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना होणार आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि कॉंग्रेस हे घटक पक्ष आहेत. तर, शिवसेना (एकनाथ शिंदे), अजित पवार (राष्ट्रवादी) आणि भाजप यांची महायुती आहे.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही भाजप महायुतीला मागे टाकू शकते असे या अहवालावरून दिसून येत आहे. एनडीए युतीला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील मतांची टक्केवारी पाहिली तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी एनडीएला ३७ टक्के मते मिळण्याची अंदाज वर्तविण्यात आला आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीशी तुलना केल्यास महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी NDA ने 48 जागांपैकी 41 जागा जिंकल्या होत्या. UPA ला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. NDA मधील भाजपला 23, शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. तर, राष्ट्रवादीला चार आणि काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. त्याचवेळी एआयएमआयएमचा एक खासदारही विजयी झाला होता.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचेच वर्चस्व
सी व्होटरच्या सर्वेक्षणात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीमसीला 23 ते 25 जागा मिळू शकतात असे म्हटले आहे. येथे भाजपला 16 ते 18 जागा तर काँग्रेस आणि डाव्या आघाडीला शून्य ते दोन जागा मुली शकतात असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये चमकदार कामगिरी केली होती. भाजपने त्यावेळी 18 जागा जिंकल्या होत्या तर टीएमसीने 22 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या खात्यात दोन जागा गेल्या होत्या.