“येओती” किंवा “येवतमाळ” म्हणून ओळखले जाणारे यवतमाळ हे बेरार साम्राज्याचे मुख्य शहर होते. यवतमाळचा अर्थ “जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण” असा होतो. आताचा यवतमाळ जिल्हा हा अलाद्दीन हसन बहमन शाहच्या अधिपत्याचा भाग होता. ज्याने 1347 मध्ये बहमनी साम्राज्याची स्थापना केली. 1956 मध्ये राज्यांच्या पुनर्रचनेपर्यंत यवतमाळ हा मध्य प्रदेशचा भाग होता. पुढे तो बॉम्बे राज्याला हस्तांतरित करण्यात आला. एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर यवतमाळ जिल्हाही त्याचाच एक भाग बनला. 2011 च्या जनगणनेनुसार यवतमाळची लोकसंख्या 1 लाख 16 हजार 551 इतकी आहे. यामध्ये पुरुषांची संख्या 58 हजार 549, तर महिलांची संख्या 58 हजार 002 इतकी आहे. 11,360 इतकी लोकसंख्या 6 वर्षांखालील आहे. यवतमाळची सरासरी साक्षरता 82.9 टक्के आहे. मराठी ही इथे सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. वऱ्हाडी ही बोलीभाषा अनेक जणांच्या तोंडी ऐकली जाते. यवतमाळ जिल्ह्यात वणी, राळेगांव, यवतमाळ, दिग्रस, आर्णी, पुसद आणि उमरखेड या विधानसभेच्या 7 जागा आहेत. अनेक दिग्ग्ज नेते या जिल्ह्याने दिले. शिवाय दोनवेळा मुख्यमंत्रीपद नाईक घराण्याच्या रुपाने यवतमाळ जिल्ह्याला मिळाले. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये या जिल्ह्याचा समावेश आहे. टिपेश्वर अभयारण्य, चिंतामणी गणपती मंदिर, किनवट अभयारण्य, महादेव मंदिर, पैनगंगा अभयारण्य यासारखी प्रेक्षणीय स्थळं यवतमाळ जिल्ह्यात येतात.
यवतमाळमधील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा