Yavatmal Election | पारधी समाजाच्या 22 वर्षीय तरुणाने मारली बाजी; भाजप आमदारांना राखता आल्या नाही नगरपंचायती
यवतमाळ जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसची सरशी झालीय. शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला. तर भाजपला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे पारधी समाजाच्या एका बावीस वर्षीय तरुणाने शिवसेनेकडून लढून निवडणूक जिंकली.
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात भाजपची सत्ता आहे. विधानसभेची पाच, तर विधानपरिषदेचा एक आमदार आहे. तरीही आपल्या मतदारसंघातील नगरपंचायती आमदारांना राखता आल्या नाहीत. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसने मात्र चांगली मुसंडी मारली आहे. 102 जागांपैकी 39 जागांवर काँग्रेसने विजय मिळविला. सत्ताधारी भाजपला फक्त तेरा जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे 25 जागा जिंकणारा पक्ष ठरला. 13 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी उमेदवार 4 जागांवर तर मनसे 3 जागांवर निवडूण आले. यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी वयाचा 22 वर्षीय तरुण नगरपंचायत निवडणुकीत जिंकून आला. पारधी समाजाच्या या तरुणाला शिवसेनेने संधी दिली होती. विजय चव्हाण कळंब असं या युवकाचं नाव आहे.
अशोक उईके यांना धक्का
राळेगावात काँग्रेसची सत्ता स्थापन होईल, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे राळेगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कळंब आणि बाभूळगाव राळेगाव या तीन नगरपंचायतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. येथे भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना हा मोठा धक्का मानला जातोय. शिवसेनेने बाळूभगावात सर्वाधिक सहा जागा बळकावल्या. झरी येथे पाच, मारेगावमध्ये चार, महागावामध्ये पाच, कळंब येथे तीन, तर राळेगावमध्ये दोन जागांवर शिवसेनेने मुसंडी मारली आहे. भाजपला बाभूळगाव, कळंब, झरी, राळेगाव येथे धक्का बसला. बाभूळगावात प्रहार एका जागेवर विजयी ठरले. कळंबमध्ये वंचितने एक जागा पटकाविली. मनसेला तीन जागा मिळाल्या.
काँग्रेसची आगेकूच, सेनेची सरशी
राळेगावमध्ये 11 जागेवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले तर कळंबमध्ये केवळ 2 जागी भाजपचे उमेदवार विजय झाले. तर बाभूळगावमध्ये 2 जागांवर भाजप उमेदवार आल्याने तेवढ्यात समाधान मानावे लागले. तर झरी नगरपंचायतीमध्ये 17 जागांपैकी केवळ 1 जागा भाजपला मिळाली. त्यामुळं हा विद्यमान भाजप आमदार संजीव रेड्डी बोडकुरवार यांना मोठा धक्का मानला जातोय. या शिवाय मारेगावमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. महागावमध्येही काँग्रेसचे 7 जागांवर तर शिवसेना 5 आणि भाजप 4 जागी उमेदवार विजयी झाले आहेत. झरीमध्ये काँग्रेस 5, शिवसेना 5. जंगोम दल 4, भाजप 1, मनसे 1 जागी उमेदवार जिंकून आले आहेत. एकूणच जिल्ह्यातील काँग्रेसची आगेकूच तर भाजपची जिल्ह्यात पिछेहाट पहायला मिळाली आहे.
खाते उघडल्याने राष्ट्रवादी समाधानी
राष्ट्रवादीने राळेगाव येथे 1 जागा बळकावली. तर बाभूळगावमध्ये 2, मारेगावमध्ये 1 जागा जिंकली. जिथं राष्ट्रवादी नव्हती तिथं खात उघडल्यानं राष्ट्रवादीने समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या शिवाय नगरपंचायत निवडणूक इतर कोणतीही नेत्याने फारशी मनावर घेतली नव्हती. त्यामुळं आलेले यश हे समाधानी आहे, असे राष्ट्रवादीच्या गोट्यातून ऐकायला मिळते.