आंदोलन करून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न, माणिकराव ठाकरे यांची भाजपवर टीका
पोलिसांना जर वाटत असेल चौकशी करावी. त्या चौकशीला देवेंद्र फडणवीस यांनी सामोरे गेले पाहिजे. ते स्वतः मुख्यमंत्री होते. गृहमंत्री होते. त्यानी चौकशीला सामोरे गेले पाहिजे, असं मत माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केलंय.
यवतमाळ : मुंबईत सागर बंगल्यात पोलिसांकडून देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीला सुरुवात झाली. एसीपी नितीन जाधव यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक चौकशी करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांसह नेत्यांची बंगल्याबाहेर गर्दी आहे. चौकशीपूर्वी फडणवीसांची (Devendra Fadnavis) भाजपच्या काही प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. असे असले तरी राज्यभरात फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपाचे आंदोलन (BJP’s Andolan) सुरूच आहेत. त्यामुळं हे आंदोलन करून सरकारवर दबाव का निर्माण केला जातो, असा सवाल काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) यांनी उपस्थित केलाय. पोलिसांना जर वाटत असेल चौकशी करावी. त्या चौकशीला देवेंद्र फडणवीस यांनी सामोरे गेले पाहिजे. ते स्वतः मुख्यमंत्री होते. गृहमंत्री होते. त्यानी चौकशीला सामोरे गेले पाहिजे, असं मत माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केलंय. मात्र चौकशीला सामोरे जाताना राज्यभर आंदोलन करून भाजप राजकीय भांडवल करीत आहे. हे चुकीचं आहे. वेगळं वातावरण निर्माण करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे, असं माणिकराव ठाकरे म्हणाले.
राज्यभर आंदोलन करणे चुकीचे
राज्यभर आंदोलन करणं हे भाजपाचे धोरण चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याला आवर घातला पाहिजे. ते जबाबदार गृहमंत्री होते. मुख्यमंत्री होते. त्यांना कायद्याचे ज्ञान आहे. चौकशीत जे आहे ते सांगितले पाहिजे, अशाप्रकारचे आंदोलन करून भाजपाला कोणता डाव साधायचा आहे, असा आरोप माणिकराव ठाकरे यांनी केला.
काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्याची अफवाच
माणिकराव ठाकरे म्हणाले, काँग्रेसचे नेते राजीनामा देतील, ही अफवा आहे. कुठेही अशाप्रकारे राजीनामा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी देतील असे नाही. हा खोटारडेपणा आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी हे नेतृत्व आहेत. काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात पुन्हा बळकट होईल, असा विश्वास आहे.