कारागृहातील बंदींच्या हाताला राखी, यांच्या पुढाकाराने बहीण-भावाचे रक्षाबंधन
कुटुंबापासून दूर असलेल्या बंदी बांधवांच्या हातावर अनपेक्षितपणे राखी बांधताच त्यांच्या अश्रृंची वाट मोकळी झाली
विवेक गावंडे, प्रतिनिधी, यवतमाळ, १ सप्टेंबर २०२३ : समाजात चांगले-वाईट लोकं राहत असतात. रागाच्या भरात एखाद्याकडून नकळत चूक घडते. कुणी धाडसी निर्णय घेऊन गुन्हा करतो. पण, कैद झाल्यानंतर त्याला पश्चाताप होतो. केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागते. ही शिक्षा भोगत असताना गुन्हेगाराला कैदी म्हणून जेलमध्ये राहावे लागते. अशावेळी त्याला कुटुंबाची आठवण येते. पण, जेलरच्या परवानगीने विशिष्ट वेळी कैद्याला भेटता येते. काल रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. आपणही बहिणीकडून राखी बांधावी, असं कैद्यांना वाटलं, ही त्यांची इच्छा अस्तित्व फाऊंडेशननं पूर्ण केलं.
कारागृहातील बहीण-भावांची भेट
यवतमाळच्या कारागृहात आज एक भावनिक क्षण पहावयास मिळाला. एकाच कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बहीण-भावाची रक्षाबंधनाला भेट झाली. अन् दोघांच्या अश्रृंचा बांध फुटला. हा क्षण भावूक करणारा होता. एकाच ठिकाणी बहीण-भाऊ शिक्षा भोगत असले तरी कारागृहात भेटणे अशक्य असते. मात्र रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. एकमेकांचे अश्रृच रक्षाबंधनाचे नाते किती अतूट हे सांगून गेले.
अश्रृंना वाट मोकळी
कुटुंबापासून दूर असलेल्या बंदी बांधवांच्या हातावर अनपेक्षितपणे राखी बांधताच त्यांच्या अश्रृंची वाट मोकळी झाली. निमीत्त होते कारागृहात रक्षाबंधन उत्सवाचे. अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. यात कारागृहातील बंदी बांधवांच्या असंख्य हातावर बहिणीच्या संरक्षणाची राखी बांधण्यात आली.
बहिणींचे संरक्षण व्हावे आणि कारागृहात असताना घराच्या आठवणीने येऊ नये, म्हणून अस्तित्व फाउंडेशनने सामाजिक उपक्रम राबविला. हे फाउंडेशन गेल्या 6 वर्षापासून सुधारगृहात हा उपक्रम राबवत आहे. बंदी बांधवात सुधारणा व्हावी म्हणून विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये रक्षाबंधनाच्या सामाजिक उपक्रमाने भर घातली आहे. कारागृह एका कौटुंबिक सोहळ्याचे साक्षीदार झाले. असं कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी यांनी सांगितले.
बहीण-भावाच्या नात्याला अधिक घट्ट करण्यासाठी हा उपक्रम राबवला गेला. यावेळी बंदीवान भावूक झाले होते. त्यांना त्यांचे जुने दिवस आठवले. आपण लहान असताना कशाप्रकारी रक्षाबंधन साजरा करत होता, याची त्यांनी आठवण झाली. या जुन्या आठवणीत ते रमले होते.