Yavatmal Suicide | मुकुटबनच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या; गिरीशच्या विधवा पत्नीला सरकार न्याय देणार काय?
आरसीसीपीएल कंपनीत नोकरी न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. 32 वर्षांच्या गिरीश परसावार या प्रकल्पग्रस्तांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबंद येथील ही ह्रदयद्रावक घटना आहे.
यवतमाळ : 10 जानेवारीपासून आरसीसीपीएल कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत आंदोलन सुरु आहे. कायमस्वरुपी नोकरी देण्यात यावी, अशी या प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. 20 डिसेंबरला प्रकल्पग्रस्तांनी कंपनीकडे 20 भूमिपुत्रांची यादी पाठविली. त्यात गिरीश परसावारच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळं आता त्याच्या पत्नीला नोकरी देण्यात यावी, अशी प्रकल्पग्रस्त समितीची मागणी आहे. 13 जानेवारीला गिरीश परसावार यांचा मृतदेह सकाळी साडेआठ वाजता सापडला. त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुकुटबंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय. मृतकाच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट सापडली आहे. त्या नोटमध्ये आरसीसीपीएल कंपनीमध्ये नोकरी न मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केलाय, अशी माहिती मुकुटबंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी दिली.
दोन मुले पोरकी
नोकरी लागते म्हणून माझ्या पतीने सर्व कागदपत्र कंपनीला दिले. पण, नोकरी काही लागत नाही म्हणून तणावात होते. मी मजुरी करतो. पण, मजुरी रोज मिळत नाही. कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्न माझे पती उपस्थित करीत होते. एक मुलगी आणि एक मुलगा आहे. आता जीवन कसे जगावे, असा सवाल मृतकाची पत्नी अनिता यांनी विचारला. प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं गिरीशला श्रद्धांजली वाहन्यात आली.
नोकरीचे कंपनीने दिले होते आश्वासन
मृतकाचा भाऊ राकेश म्हणाले, दोन्ही भावांनी सहमती करून त्याला कागदपत्र घेऊन पाठविले. तो कंपनीत नेहमी जाणे येणे करत होता. बऱ्याच दिवसांपासून उपोषण सुरू होते. पण, आपल्याला नोकरी लागते की, नाही असा तणाव होता. कंपनीने आमची शेती 2009 मध्ये घेतली होती. वडील मरण पावले होते. दोन भाऊ आणि एक बहीण होतो. कंपनीने जमीन घेतली तेव्हा तोंडी आश्वासन दिले होते. शेती घेतली. त्याच्या मोबदल्यात तिन्ही भावांना नोकरीवर घेऊ. तो लहान असल्यानं आम्ही त्याला कंपनीकडे पाठविले होते. त्यासंदर्भात कागदपत्र दिले होते. पण, ज्यांनी ज्यांनी जमीन दिली त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप नोकरी दिली नाही. आपल्याला रोज मजुरी मिळत नाही. आणि कंपनी रोजगार देईल की, नाही याची काही शाश्वती नव्हती. कुटुंबाचे पालनपोषण कसे करणार, या चिंतेत गिरीश राहत होता, असे त्याच्या मोठ्या भावाने सांगितले.