यवतमाळमधील डॉ. अशोक पाल हत्याकांडाचा उलगडा, 3 जण अटकेत, क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याचे निष्पन्न
डॉ अशोक पाल हा ग्रंथालयाकडून वसतिगृहाकडे पायी चालला होता. तिथं त्याला मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून जात असलेल्या ऋषीकेश सावळे, प्रवीण गुंडचवार आणि एक विधी संघर्ष बालक यांचा गतिरोधकावर धक्का लागला. यातून अशोक व या तिघांमध्ये वाद झाला. झालेल्या वादातून अशोकवर बटन चाकूने सपासप वार करून आरोपींनी पळ काढला.

यवतमाळ : यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अंतिम वर्षाचा शिक्षण घेणाऱ्या डॉ. अशोक पाल या विद्यार्थ्याची 3 दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. अशोक पाल ग्रंथालयातून वसतिगृहकडे जात असताना त्ययच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकारानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व शिकाऊ डॉक्टर आक्रमक झाले होते. त्यांनी गेल्या 4 दिवसापासून काम बंद आंदोलन करत महाविद्यालयाच्या गेटवर धरणे आंदोलन सुरू केले होते.
मारेकऱ्यांच्या तपासासाठी सात पथके कार्यान्वित
महाविद्यालयात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांसोबत श्रीकृष्ण जन्माष्टमी वेळी यवतमाळ शहरातील तुषार नागदेवते व आकाश गोफने या तरुणांचा मुलींच्या वसतिगृहजवळ लघुशंका केल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यातूनच ही हत्या झाल्याचे सांगितले जात होते. या दोघांना यवतमाळ पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. मात्र त्यांच्याकडून सदर प्रकरणाशी ताळमेळ जुळत नव्हता. घटनेवेळी दोघेही यवतमाळमध्ये नसल्याचे पुढे आले होते. त्यानंतर यवतमाळ पोलिसांपुढे खरे मारेकरी शोधण्याचे आव्हान होते. कुठूनही तपासाचा धागा पोलिसांना मिळत नव्हता. पोलीस अधिक्षक डॉ दिलीप भुजबळ यांनी एकूण 7 पथके कार्यान्वित केली आणि खऱ्या मारेकऱ्यांचा शोध सुरू झाला. एकूण 100 खबरी या प्रकरणावर नजर ठेवून होते. अशोक पालच्या सोबत शिकणाऱ्या 25 ते 30 विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्यात आले होते. मात्र कुठलाच ‘क्लू’ यातून मिळत नव्हता. पोलिसांनी पुन्हा तांत्रिक व पारंपरिक तपास पद्धतीचा वापर करत या प्रकरणाचा छडा लावला आणि खऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन कबुली जवाब नोंदविला.
‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याच्या ‘क्लू’ने झाला गुन्ह्याचा उलगडा
यवतमाळ पोलीस दलात काम करणाऱ्या निलेश राठोड हा कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. तो या रुग्णालय परिसरात राहतो. घटनेपासून तो इथल्या हालचालीवर लक्ष ठेऊन होता. त्याने आपल्या गुप्त खबरीच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखांना आणि तपास पथकाला तपासाची दिशा मिळवून दिली आणि प्रकरणाचा उलगडा केला. निलेशच्या कार्याचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.
पोलिसांकडून शिताफीने हत्येचा उलगडा
डॉ अशोक पाल हा ग्रंथालयाकडून वसतिगृहाकडे पायी चालला होता. तिथं त्याला मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून जात असलेल्या ऋषीकेश सावळे, प्रवीण गुंडचवार आणि एक विधी संघर्ष बालक यांचा गतिरोधकावर धक्का लागला. यातून अशोक व या तिघांमध्ये वाद झाला. झालेल्या वादातून अशोकवर बटन चाकूने सपासप वार करून आरोपींनी पळ काढला. या घटनेत अशोकच्या मृत्यू झाला. यवतमाळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने या सस्पेन्स असलेल्या प्रकरणात कुठेही तपासाचा धागा मिळत नसताना देखील प्रकरणाचा उलगडा केल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे. तपास पथकाला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी 1 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले. मात्र या सगळ्यात एका गरीब घरच्या हुशार विद्यार्थ्याचा हकनाक जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (yavatmal medical student dr ashok pal murder mystry solved, three arrested)