दिल्लीतला मोठा काँग्रेस नेता राष्ट्रवादीच्या गळाला, पवार म्हणतात, आम्हाला आधी घर पक्कं करावं लागेल!
मागील वर्षी 2020 मध्ये योगानंद शास्त्री यांनी काँग्रेसचे दिल्लीतील प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यानंतर काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला होता. आज शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.
नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज दिल्लीचे माजी विधानसभा अध्यक्ष योगानंद शास्त्री यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. नवी दिल्लीत एका भव्य कार्यक्रमात हा सोहळा पार पडला. योगानंद शास्त्री (Yoganand Shastri) ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून दिल्लीतील यापूर्वीच्या शीला दीक्षित (Sheela Dixit) सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवले आहे. गेल्या काही दिवसांपासून योगानंद शास्त्री यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी चर्चा सुरु होती. आजा 17 नोव्हेंबर रोजी या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
देशाच्या राजधानीत आधी पक्क घर करावं लागेल- पवार
योगानंद शास्त्री आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत या कार्यक्रमात शरद पवार यांनी केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशाच्या राजधानीत योगानंद शास्त्री यांच्यासारख्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे ही खूप महत्त्वाची बाब आहे. आज केंद्रात भाजपच्या सरकारमुळे अनेक सांप्रदायिक शक्तींनी अराजकता मांडली आहे. अशा स्थितीत जनतेला व्यक्त होण्यासाठी एका व्यासपीठाची गरज आहे. योगानंद शास्त्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेशी चर्चा करावी, जनतेला असं व्यासपीठ निर्माण करून द्यावं. जेणेकरून समाजात शांतता आणि एकजूट नांदेल. योगानंद शास्त्री यांनी ही जबाबदारी स्वीकारल्याचा मला आनंद होत आहे, त्यांचं पक्षात मी स्वागत करतो, ‘ अशा शब्दात शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
कोण आहेत योगानंद शास्त्री?
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असलेले योगानंद शास्त्री हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. योगानंद शास्त्री यांनी आतापर्यंत तीन वेळा दिल्ली विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. 2008-2013 पर्यंत ते दिल्ली विधानसभा अध्यक्ष होते. शीला दीक्षित यांच्या मंत्रिमंडळात ते पहिल्यांदा विकास, अन्न व नागरि पुरवठा मंत्री होते. तसेच दीक्षित यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात ते समाजकल्याण मंत्री होते. त्यांनी दोन वेळा मालवीय नगर विधानसभा मतदारसंघाचे आणि एकदा मेहरौली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मागील वर्षी 2020 मध्ये योगानंद शास्त्री यांनी काँग्रेसचे दिल्लीतील प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यानंतर काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला होता.
इतर बातम्या-