योगेश कदम यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट, त्या पोलिसांबाबत मोठं वक्तव्य
मोठी बातमी समोर येत आहे, आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं.

मोठी बातमीस समोर येत आहे, आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. संतोष देशमुख प्रकरणात काही पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना योगेश कदम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांना सोडायचं नाही, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. घटनेतील एक आरोपी वगळता सर्व जेलमध्ये आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली.
ही घटना जेव्हा घडली तेव्हा कर्तव्यावर असलेले सर्व अंमलदार, हवालदार यांची बदली करा. मी कोणाचीही गय करणार नाही, माझ्या राज्यात असले चाळे चालणार नाहीत, मी बडतर्फ करेन, आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांना सोडायचे नाही. कोणीही असेल तर कारवाई करा अशा सूचना यावेळी योगेश कदम यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
बीडच्या जेल मधील व्हीआयपी ट्रीटमेंटची माहिती घेऊन कारवाई करणार, आरोपी स्थलांतर बाबत मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. या घटनेमुळे आमच्या प्रशासनाचे देखील डोळे उघडले आहेत. वाल्मीक कराड गँगला इतर कारागृहात हलविण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून सांगणार आहे, असे माध्यमांशी बोलताना यावेळी योगेश कदम यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी मला इथे पाठविले आहे. आरोपींना फाशी झाली पाहिजे या विचाराचा मी आहे. अशी क्रूरता मी खपवून घेणारा नाही. योग्य न्याय होईल, असंही यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना जेलमध्ये मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं. महादेव गित्ते याला या घटनेनंतर दुसरीकडे हलवण्यात आलं आहे.