उद्धव ठाकरेंना किती मदत करायची हे आता बेस्ट ठरवेल: शशांक राव
मुंबई: “2007 असो किंवा 2011 कोणत्याही साली लागलेल्या कर्मचाऱ्याला किमान 7 हजार रुपये वेतन वाढणार आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांना पगारवाढ पुढच्याच महिन्याच्या पगारातून मिळेल. इतकंच नाही तर 2016 पासूनची सर्व थकबाकीही नव्या करारानुसार मिळेल. हा कामगार एकजुटीचा विजय आहे”, असं म्हणत बेस्ट कामगार युनियनचे नेते शशांक राव यांनी बेस्ट संप (BEST STRIKE) मागे घेत असल्याची घोषणा केली. […]
मुंबई: “2007 असो किंवा 2011 कोणत्याही साली लागलेल्या कर्मचाऱ्याला किमान 7 हजार रुपये वेतन वाढणार आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांना पगारवाढ पुढच्याच महिन्याच्या पगारातून मिळेल. इतकंच नाही तर 2016 पासूनची सर्व थकबाकीही नव्या करारानुसार मिळेल. हा कामगार एकजुटीचा विजय आहे”, असं म्हणत बेस्ट कामगार युनियनचे नेते शशांक राव यांनी बेस्ट संप (BEST STRIKE) मागे घेत असल्याची घोषणा केली.
उद्धव ठाकरे म्हणाले पैसे नाहीत, कुठून आणू, बेस्टला किती मदत करायची? पण आता तुम्हाला किती मदत करायची हे आता बेस्ट ठरवेल असं शशांक राव यांनी ठणकावून सांगितलं.
उद्धवजी म्हणाले पैसे नाहीत, कुठून आणायचे? बोलले की नाही? बेस्टला किती मदत करायची, असंही ते म्हणाले. पण आता ही बेस्ट ठरवेल तुम्हाला किती मदत करायची, असं शशांक राव म्हणाले.
संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्माच्या नोटीसा मिळाल्या. पण त्या घरात फोटोफ्रेम करुन ठेवा. कारण तुम्ही एका ऐतिहासिक लढ्याचे साक्षीदार आहात, असं शशांक राव म्हणाले. तसंच संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, असं कोर्टात ठरल्याचं शशांक राव यांनी सांगितलं.
शिवसेनेकडे बेस्ट समिती आहे. परंतु त्यांनी ज्युनियर ग्रेडचा प्रश्न कधीच मिटवला नाही. हा प्रश्न मिटवणं त्यांना सहज शक्य होतं. पण त्यांनी तो प्रश्न कायमच धुमसत ठेवला, असा आरोप शंशाक राव यांनी केला.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सर्वकाही कोर्टात ऑर्डर लिहून घेतली आहे. काहींना मिरच्या झोंबल्या, मात्र हा कामगारांचा लढा यशस्वी झाल्याचं समाधान आहे, असं शंशाक राव यांनी नमूद केलं.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर आज नवव्या दिवशी मागे घेण्यात आला. बेस्ट संप (BEST STRIKE) एका तासाच्या आत मागे घ्या, असे आदेश मुंबई हायकोर्टाने बेस्ट कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यानंतर बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या उपस्थितीत बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. वडाळा डेपोत बेस्ट कर्मचारी जमले होते. इथे त्यांनी बेस्ट संप मागे घेत असल्याची घोषणा केली.
तोडगा काय निघाला?
- बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी समन्वयाची नेमणूक करण्यात आली.
- संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, तसंच त्यांचा पगारही कापला जाणार नाही
- जानेवारी 2019 पासून दहा टप्प्यात वेतनवाढ लागू करणार
- अंतिम तडजोडीसाठी बेस्ट प्रशासन/सरकारला तीन महिन्यांची मुदत
- पुढील महिन्यांपासून पगारवाढ मिळणार
- कोणत्याही वर्षी रुजू झालेल्या कर्मचाऱ्याला 7 हजार पगारवाढ मिळणार
- बेस्टचं बीएमसीत विलिनीकरणाबाबतही लवकरच निर्णय होणार