धारावीत कोरोना रुग्णांची शंभरी पार, माटुंगा लेबर कॅम्पमधील चौघांना लागण
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या (Dharavi Corona Virus) जाणाऱ्या धारावीत कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे.
मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या (Dharavi Corona Virus) जाणाऱ्या धारावीत कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. शुक्रवारी दिवसभरात 16 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 117 वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींची संख्या 10 वर पोहोचली आहे.
धारावी परिसरात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत (Dharavi Corona Virus) आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. धारावीमधील डॉ. बालिगा नगरमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आसपासच्या भागात कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. आता कोरोनाचा संसर्ग माटुंगा लेबर कॅम्पमध्येही पोहोचला आहे. माटुंगा लेबर कॅम्पमधील चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आलं आहे.
त्यामुळे या भागातील नागरिकांच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. धारावीमधील डॉ. बालिगा नगर, वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर, मदिना नगर, धनवडा चाळ, मुस्लीम नगर, सोशल नगर, जनता सोसायटी, कल्याणवाडी, पीएमजीपी कॉलनी, मुरुगन चाळ, राजीव गांधी चाळ, शास्त्री नगर, नेहरू चाळ, इंदिरा चाळ, गुलमोहर चाळ, साईराज नगर, ट्रान्झिट कॅम्प, रामजी चाळ, सूर्योदय सोसायटी, लक्ष्मी चाळ, शिव शक्ती नगर, माटुंगा लेबर कॅम्प या ठिकाणी करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 648 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 328 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील 184 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. तर पुण्यात 78 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.
मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. एकट्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन हजाराच्या पार गेल्याने धाकधूक वाढली (Dharavi Corona Virus) आहे.