कुर्ल्याच्या मेहता इमारतीला लागलेली आग अखेर नियंत्रणात
कुर्ला पश्चिमेकडे आंबेडकर नगर परिसरात मेहता को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली.
मुंबई : कुर्ला पश्चिमेतील स. गो. बर्वे मार्गावर असलेल्या एका निवासी इमारतीला शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली (Fire in Kurla Mehta building). या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अखेरअग्निशमन दलाला यश आले आहे. रात्री दहा वाजेपासून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न करत होते. मात्र, सिलेंडराच्या स्फोटामुळे ही आग वाढत होती (Fire in Kurla Mehta building). अखेर रात्री दीड वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या दूर्घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.
कुर्ला पश्चिमेकडे आंबेडकर नगर परिसरात मेहता को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. या आगीमागील कारण अद्यापही समोर आलेले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही आग सुरुवातीला तळमजल्याला लागली. त्यानंतर हळूहळू ही आग इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. ही आग इतकी भीषण होती की, दूरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. सिलेंडराच्या स्फोटामुळे ही आग वाढत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या, 2 शिघ्र प्रतिक्रिया वाहन, 6 जंबो टॅकर्स आणि एक पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु होते. अखेर रात्री दीड वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. रात्री सव्वा दोनच्या सुमारास ही आग पूर्णपणे विझली.