बिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात, मुंबई पोलिसांकडून नियम सांगत एसआयटीला समज
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेलं बिहार पोलिसांचं पथक नजर कैदेत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे (Sushant Singh Suicide case).
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या पथकावर मुंबई पोलिसांची करडी नजर असल्याचं दिसत आहे (Sushant Singh Suicide case). बिहार पोलिसांनी वेगाने सूत्रं हलवत तपासाला सुरुवात केली. यासाठी बिहार पोलिसांचं एक पथक थेट मुंबईतही दाखल झालं. मात्र, आता या पथकांला मुंबई पोलिसांनी कायद्याच्या कचाट्यात पकडलं आहे. मुंबई पोलिसांनी या पथकाला नियम दाखवत मुंबईत तपासाआधी स्थानिक समन्वयक अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याचं सांगितलं. तसेच याची खबरदारी घेण्याची समज दिली.
मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना परवानगी न घेता आणि स्थानिक पोलिसांना न कळवता तपास केल्याबद्दल कायदेशीर समज दिली आहे. परराज्यातून येणाऱ्या पोलिसांनी मुंबईत आल्यावर आधी मुंबई पोलिसांचे समन्वयक अधिकारी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची परवानगी घेण्याचा नियम आहे. त्यांना कोणत्या गुन्ह्याचा, काय तपास करायचा आहे हे सांगावं लागतं. त्यासाठी तसा रितसर अर्ज करावा लागतो.
बिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात
दुसऱ्या बाजूला सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीसही करत आहेत. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा कोणताही गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही. या कलमाखाली बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासही सुरु केला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांची नाचक्की झाली आहे. बिहार पोलिसांचा तपासाचा धडाका सुरु असल्याने मुंबई पोलीस अडचणीत आले होते. यामुळे आता मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्यास सुरुवात केली आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
बिहार पोलीस मुंबई पोलिसांचे समन्वयक अधिकारी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना भेटायला आले. त्यावेळी बिहार पोलिसांना अनेक तास ताटकळत बसवण्यात आलं. त्यानंतर त्यांना माध्यमांशी देखील बोलू देण्यात आलं नाही. माध्यमांच्या गराड्यातून काढताना त्यांना धक्काबुक्की झाल्याचाही आरोप होत आहे. यानंतर बिहार पोलिसांना घेऊन मुंबई पोलिसांची गाडी दूर निघून गेली.
बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांनी अशाप्रकारे घेऊन जाण्याचं कोणतंही कारण नव्हतं. असं असतानाही मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना अशा पद्धतीने नेल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर बिहार पोलिसांना नजर कैदेत तर ठेवलं जाणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ मुंबई गाठली. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क केला नाही. तसेच बिहार पोलिसांनी परस्पर तपास सुरु केला. त्यांनी सुशांत सिंह यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, त्याच्या बँक खात्याची माहिती मिळवली. इतर महत्वाच्या साक्षीदारांचे जबाबही घेतले. बिहार पोलिसांनी गेल्या 4 दिवसांमध्ये अनेक पातळीवर गुन्ह्याचा तपास केला. बिहार पोलिसांसाठी मुख्य आरोपी असलेली अभिनेत्री रिया सुप्रीम कोर्टात गेली. अन्यथा तिला अटक होण्याचीही शक्यता होती.
मुंबई पोलिसांची बिहार पोलिसांना समज
दरम्यान, बिहार पोलिसांच्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (31 जुलै) मुंबई पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची भेट घेतली. पोलीस उपायुक्त अकबर पठाण हे मुंबई पोलिसांचे समन्वयक अधिकारी आहेत. आज मुंबई क्राईमच्या अधिकाऱ्यांनी बिहार पोलिसांना बोलावलं आणि त्यांना इतर राज्यातील पोलिसांना मुंबईत तपास करायचा असेल तर त्याबाबत काय कायदा आहे हे समजावून सांगितलं.
यानंतर बिहार पोलिसांनी मुंबईत तपास करायचा असून त्याबाबत सहकार्य करावं, असा अर्ज लिहून दिला. हा अर्ज मुंबई पोलिसांच्या समन्वयक अधिकारी अकबर पठाण यांच्याकडे देण्यात आला. तो अर्ज उपायुक्त पठाण यांनी स्वीकारला. तसेच या अर्जावर कायदेशीर सल्ला घेऊन तुम्हाला सहकार्य केलं जाईल, असं बिहार पोलिसांना सांगितलं आहे.
मुंबई पोलीस बिहार पोलिसांच्या अर्जावर कायदेशीर सल्ला घेणार
आता मुंबई पोलीस बिहार पोलिसांच्या अर्जावर कायदेशीर सल्ला घेणार आहेत. त्यानंतर बिहार पोलिसांना तपासात सहकार्य करायचं की नाही हे ठरवणार आहेत. प्रत्यक्षात बिहार पोलिसांनी मुंबईत जो तपासाचा धडाका सुरु केला होता त्यामुळे मुंबई पोलीस मोठ्या प्रमाणात अडचणीत आले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना कायद्यात पकडलं आहे.
बिहार पोलिसांच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती ही सुप्रीम कोर्टात गेली आहे. तिने सुशांतच्या आत्महत्येचं प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करावा अशी मागणी केली आहे. याचा निकाल येत्या 2-4 दिवसात लागण्याची शक्यता आहे. निदान तोपर्यंत तरी बिहार पोलिसांनी गप्प बसावं, असं मुंबई पोलिसांना वाटत असावं. याचमुळे त्यांनी कायदेशीर सल्ला घेण्याचं ठरवलं असावं, असा अंदाज लावला जात आहे.
बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांकडून सीबीआय चौकशीची मागणी
आज शनिवार (1 ऑगस्ट) आणि उद्या रविवार असे 2 दिवस सुट्टीचे आहेत. त्यानंतर पुढील 2 दिवसात अभिनेत्री रियाच्या याचिकेवर सुनावणी होऊन निकालही लागू शकतो. यामुळे वेळ मारुन नेण्यासाठी मुंबई पोलिसांनी कायदेशीर सल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला असावा ,असं बोललं जातं आहे. दरम्यान, नुकताच बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील मोदी यांनी मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच केंद्र सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
हेही वाचा :
Sushant Singh Rajput | रियाची सुशांतवर काळी जादू, सुशांतच्या बहिणीचे गंभीर आरोप
फडणवीसांकडून CBI चौकशीची मागणी, सुशांत प्रकरणात नव्या घडामोडी, रियाचा खंडणीबाबतचा व्हिडीओ व्हायरल
Sushant Singh Suicide case