हिंमत असेल तर पुन्हा लोकसभा निवडणूक घ्या, शरद पवारांचं फडणवीसांना आव्हान
'हिंमत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा' असं खुलं आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिलं होतं

मुंबई : फक्त राज्याची विधानसभा निवडणूक कशाला घेता? पूर्ण देशाचीच घ्या, असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं (Sharad Pawar challenges Devendra Fadnavis) आहे. ‘हिंमत असेल तर पुन्हा विधानसभा निवडणुका घ्या’ अशा शब्दात फडणवीसांनी भाजपच्या अधिवेशनातून महाविकास आघाडीला ललकारलं होतं.
‘फक्त महाराष्ट्र या एका राज्याचीच विधानसभा निवडणूक पुन्हा कशाला घेता? संपूर्ण देशाचीच लोकसभा निवडणूक घ्या’ असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पवारांनी भीमा कोरेगाव, एल्गार परिषद अशा अनेक विषयांवर भाष्य केलं.
‘हिंमत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा’ असं खुलं आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिलं होतं. ‘सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या’, असं फडणवीस म्हणाले होते.
हेही वाचा : भाजपला चांगल्या डॉक्टरची गरज, हिम्मत असेल तर लोकसभा निवडणूक पुन्हा घ्या : नवाब मलिक
‘महाविकास आघाडी सरकार पाडण्याची गरज नाही, ते विसंगतीने पडेल’ असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनाही वाटतं. नवी मुंबईत भाजपच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात फडणवीस आणि पाटील बोलत होते.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
‘आमचं सरकार मजबूत आहे. आम्ही तिघे एकत्र आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर आमचं सरकार पाडून दाखवा’, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला खुलं आव्हान दिलं होतं.
हिंमत असेल तर भाजपने आता लोकसभा निवडणूक घेऊन दाखवावी. दिल्लीत जशी भाजपची विधानसभेला अवस्था झाली, तशी संपूर्ण देशात होईल, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही केला होता. (Sharad Pawar challenges Devendra Fadnavis)