बिहारमध्येही शिंदे, अजितदादा पॅटर्न?, काँग्रेसचे 10 आमदार फुटणार?; नेम लालूंवर गेम काँग्रेसचा
काँग्रेसचे दहा आमदार फुटले तर लालू प्रसाद यादव यांची खेळी उलथणार आहे. नितीश कुमार हे लालूंपासून वेगळे झाले आणि त्यांनी भाजपशी युती केली तरी नितीश कुमार यांना आठ आमदारांचं बळ लागणार आहे. पण काँग्रेसचे आमदार आयतेच गळाला लागले तर त्यांना ही जुळवाजुळव करण्याची वेळ येणार नसल्याचंही सांगितलं जात आहे.
पाटणा | 26 जानेवारी 2024 : बिहारच्या राजकारणाला जोरदार धक्के बसण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे कोणत्याही क्षणी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितीश कुमार हे भाजपसोबत युती करणार असून पुन्हा एकदा राज्यात भाजप आणि नितीश कुमार यांचं सरकार येण्याची शक्यता आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीसाठी हा मोठा झटका असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, नितीश कुमार यांच्या या बंडाचा लालूप्रसाद यांना तर फटका बसणार आहेच, पण काँग्रेसलाही फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार पॅटर्न अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयूची आघाडी तुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये जाण्याची शक्यता आहे. तशी जोरदार चर्चा सुरू आहे. नितीश कुमार यांच्या या नव्या समीकरणाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे काही आमदारा भाजपच्या संपर्कात असल्याची बातमी येऊ धडकली आहे. त्यामुळे बिहारमध्ये भाजप अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तेच बिहारमध्ये घडणार
भाजपच्याच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे 10 हून अधिक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. काँग्रेसचे हे आमदार बिहारमध्ये आपली वेगळी राजकीय चूल मांडण्याची शक्यता आहेत. हे आमदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच जे महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीत घडलं तेच बिहारमध्ये काँग्रेसमध्ये घडताना दिसणार आहे. या नव्या समीकरणामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची चांगलीच गोची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तरीही आमदारकी वाचणार
काँग्रेसचे दहा आमदार फुटले तर लालू प्रसाद यादव यांची खेळी उलथणार आहे. नितीश कुमार हे लालूंपासून वेगळे झाले आणि त्यांनी भाजपशी युती केली तरी नितीश कुमार यांना आठ आमदारांचं बळ लागणार आहे. त्याशिवाय त्यांचं बहुमत पूर्ण होणार नाही. अशावेळी भाजपसोबत काँग्रेसचे दहा आमदार आल्यास बहुमताचा आकडा पूर्ण होणार आहे. नितीश कुमार हे जीतनराम मांझी यांचे चार आमदार, एमआयएमचा एक आणि एक अपक्ष आमदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पण काँग्रेसचे आमदार आयतेच गळाला लागले तर त्यांना ही जुळवाजुळव करण्याची वेळ येणार नसल्याचंही सांगितलं जात आहे. काँग्रेसचे बिहारमध्ये 19 आमदार आहेत. त्यामुळे 10 आमदार फुटून त्यांनी वेगळा गट स्थापन केला तरी त्यांची आमदारकी जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे.