दोन पॅसेंजर ट्रेनची धडक, 10 प्रवाशांचा मृत्यू, 10 जखमी; अनेक लोक अडकले
दोन पॅसेंजर ट्रेनची धडक, 10 प्रवाशांचा मृत्यू, 10 जखमी; अनेक लोक अडकले 10 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 10 प्रवाशी जखमी झाले आहेत. दहाही प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर युद्ध पातळीवर उपचार सुरू आहेत. तर दोन डब्यांच्या मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्याचं रेल्वे सूत्रांनी सांगितलं.
विजयनगरम | 29 ऑक्टोबर 2023 : आंध्रप्रदेशातील विजयनगरम येथे दोन पॅसेंजर ट्रेनची धडक झाली आहे. या धडकेनंतर दोन्ही पॅसेंजर ट्रेनचे डबे रेल्वे रुळावरून खाली उतरल्या आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 10 प्रवाशी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच मदतकार्य करणारी टीम घटनास्थळी पोहोचली आहे. अपघातात दोन्ही ट्रेनमध्ये फसलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर दुसरीकडे दोन पॅसेंजरची धडक झाल्याने एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत आहे.
कोठावलासा ब्लॉकमध्ये कंटाकपल्लीच्या विशाखापट्टनम-पलसासा पॅसेंजर (ट्रेन नंबर 08532) ची धडक लागल्यानंतर विशाखापट्टनम -रायगडा पॅसेंजर ( ट्रेन नंबर 08504) चे काही डबे रेल्वे रुळावरून उतरले आहेत. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी तात्काळ उपाय करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विजयनगरममधील जिल्ह्यांमधील अधिकाधिक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्याचे आदेशही दिले आहेत.
कसा झाला अपघात
ओव्हरहेड वायर तुटल्याने विशाखापट्टनम- रायगडा पॅसेंजर ट्रेन रुळावर उभी होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या विशाखापट्टनम-पलासा पॅसेंजरने उभ्या असलेल्या ट्रेनला जोरदार धडक दिली. त्यामुळे पॅसेंजरचे तीन डबे रुळावरून खाली उतरले. ही टक्कर अत्यंत भीषण होती. या धडकेत एका डब्याचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. मंडल रेल्वे प्रबंधकानेही पॅसेंजरच्या तीन डब्यांचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. या दुर्घटनेची माहिती स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफला देण्यात आली आहे. अॅक्सिडेंट रिलीफ ट्रेनही घटनास्थळी पोहोचली आहे. जखमींना रुग्णवाहिकेतून स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
मोदींकडून दु:ख व्यक्त
दरम्यान, या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मोदींनी संवेदना व्यक्त केली आहे. तसेच जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून प्रार्थना केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवर यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली आहे. तसं ट्विटच मोदी यांनी केलं आहे.
रेल्वेकडून हेल्प नंबर जारी
रेल्वे नंबर: 83003, 83004, 83005, 83006
बीएसएनएल लँड लाइन नंबर- 08912746330; 08912744619
एअरटेल: 8106053051, 8106053052
बीएसएनएल: 8500041670, 8500041671