लुधियाना : पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील गियासपुरा परिसरात आज सकाळी अत्यंत दुर्देवी घटना घडली. एका दुकानातील गॅस लिक झाल्याने तीन मुलासहीत 11 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. यात एका मुलाचाही समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफचे दोन पथकही घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
आज सकाळी साडे सात वाजता ही दुर्देवी घटना घडली. गोयल किराणा स्टोर्स हे दुकान खालच्या मजल्यावर होतं. त्याच्यावरच्या मजल्यावर कुटुंब राहत होतं. विषारी वायू गळती झाल्यानंतर लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे या लोकांनी आरडाओरड सुरू केली. लोक किंचाळतच सैरावैरा धावत होते. आपला जीवमुठीत घेऊन लोक दूरवर जाताना दिसत होते. अरविंद चौबे या प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, त्याने गटारातून धूर येताना पाहिला. पावसामुळे गटर बंद झालं होतं. त्यामुळे गटारातूनच गॅस येण्याची शक्यात आहे. गॅस गळतीनंतर असंख्य लोक बेशुद्ध होऊन खाली पडले. त्याचे व्हिडीओ काही लोकांनी बनवल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
गॅस गळतीमुळे 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण कोणत्या गॅस गळतीमुळे या लोकांचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या गॅसचा वास अजूनही या परिसरातील काही भागात आहे. या वायूगळतीमुळे बेशुद्ध झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. जमालवूर येथील रहिवाशी शंभू नारायन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा 40 वर्षीय भाचा कबीलाश कुमार आणि त्याची पत्नी वर्षा देवी, तसेच त्यांची तीन मुले कल्पना, अभय आणि आर्यन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
ज्या ठिकाणी गॅस गळती झाली तिथून काही अंतरावर डॉ. शंभूनारायण सिंह राहतात. त्यांनी या घटनेची माहिती दिली. गॅस गळतीनंतर घरातील पाच लोक बेशुद्ध पडले. पण त्यांना घराच्या जवळ जाऊ दिलं नाही, असं शंभूनारायण सिंह यांनी सांगितलं. तर माझ्या काकाची या ठिकाणी आरती क्लिनिक नावाचं दुकान आहे. गॅस गळतीनंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब बेशुद्ध पडलं आहे. काहींचे मृत्यू झाले आहेत. नातेवाईंकाचे मृतदेह निळे पडले आहेत, असं अंजल कुमार यांनी सांगितलं.
दरम्यान, या किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आलेला एक व्यक्ती बेशुद्ध पडला आहे. त्याला घेण्यासाठी गेलेले लोकही बेशुद्ध पडले. दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या चार ड्रीप फ्रिजरमधून ही गॅस गळती झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी गॅस लिकेज झालेल्या गोयल किराणा स्टोअर्समधील सामानांची तपासणी सुरू केली आहे. तसेच हा संपूर्ण परिसर सील केला आहे.