लखनऊ: संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, कानपूरनंतर आता लखनऊमध्येही हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचं प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये 9 दिवसात 130 लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर लखनऊमध्ये हार्ट अटॅकचे रुग्ण वाढले असून रुग्णालयात हृदयरोगींची संख्या वाढली आहे.
थंडीची प्रचंड लाट आल्याने रक्ताच्या गाठी होत आहेत. त्यामुळे अचानक ब्लड प्रेशर वाढत आहे. परिणामी हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय.
कडाक्याच्या थंडीत केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नव्हे तर तरुणांनाही हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे प्रत्येक वयाच्या व्यक्तीने थंडीपासून स्वत:चा बचाव केला पाहिजे. शक्यतो घरातच राहा. घराबाहेर पडू नका. बाहेर पडत असाल तर संपूर्ण अंग झाकूनच बाहेर पडा, असा सल्लाही डॉक्टर देत आहेत.
कानपूरनंतर लखनऊमध्येही हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तर प्रदेशात सर्वाधिक थंडी आहे. यापूर्वी एवढे मृत्यू कधी पाहिले नव्हते. पोस्ट कोव्हिड इफेक्ट आणि थंडीचे डेडली कॉम्बिनेशन बनत आहे, असं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
सरकारी आकडेवारीनुसार लखनऊमध्ये केवळ 9 दिवसात कार्डिओलॉजी हॉस्पिटलमध्ये हार्ट अटॅकने 131 लोकांचा मृत्यू झाला आहे. रोज रुग्णालयात 1000 ते 15000 रुग्ण येत आहेत. मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत असल्याने रुग्णालयात बसायलाही जागा उरलेली नाहीये. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रासाला सामोरे जावं लागत आहे.