मेहंदी, बाशिंग अस्तव्यस्त… लगीन घरात वरातीआधीच स्फोट; लग्नाच्या आदल्याच दिवशी नवरीची आई आणि…
ज्या घरात लग्नाची लगबग सुरू होती... जे घर पाहुण्यांनी भरून गेलं होतं... जिथे दुसऱ्याच दिवशी वरात येणार होती... ज्या घरात आनंदाचं आणि उत्सवाचं वातावरण होतं, तिथे आज मातम आणि आक्रोश सुरू आहे.
हरदोई : लग्न म्हटलं तर सर्वत्र आनंदी आनंद असतो. संपूर्ण घरात जणू काही उत्सवाचं वातावरण असतं. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील एका घरातही लग्नाची अशीच धुमधडाक्यात तयारी सुरू होती. नवरीने हाताला मेहंदी काढली होती. बाशिंग बांधले होते. आता केव्हाही नवरदेवाची वरात दारात येणार होती. तितक्यात घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत नवरी आई आणि आत्याचा जागीच मृत्यू झाला. जिथे लग्नाचा जल्लोष होता, त्या ठिकाणी आक्रोश आणि मातम सुरू झाला. संपूर्ण गावावरच शोककळा पसरली. हे दृश्य पाहून अनेकांची हृदये पिळवटून निघून गेली.
हरदोई जिल्ह्यातील नीर गावात ही दुर्देवी घटना घडली. लगीन घर असल्याने घरात धामधूम सुरू होती. घराचा गॅस लिकेज झाल्याचं कुणाच्याच लक्षात आलं नाही. नवऱ्या मुलीची आई आणि आत्या पाहुण्यांची ऊठबस करण्यात दंग होत्या. पाहुण्यांसाठी काही बनवण्यासाठी त्या स्वयंपाक घरात गेल्या. घरात जाऊन त्यांनी गॅस पेटवण्यासाठी माचिस लावताच मोठा स्फोट झाला. जोरदार स्फोटबरोबरच प्रचंड आग पेटली. या स्फोटात नवरी मुलीची आई आणि आत्या जागीच ठार झाली.
पाईपमध्ये पाय फसला
या आगीनंतर घरातील लोकही घाबरले. जीव वाचवण्यासाठी घरातील प्रत्येकाने बाहेर धूम ठोकली. आगीनंतर नवरीच्या आईने आणि आत्यानेही घरातून पळ काढण्यास सुरुवात केली. पण गॅस सिलिंडरच्या पाईपमध्ये दोघींचा पाय फसला आणि त्या दोघीही जागीच पडल्या. एव्हाना आग संपूर्ण घरभर पसरली. आगीचं तांडव झालं अन् या दोघी आगीमध्ये होरपळून ठार झाल्या. आग लागल्यानंतर काही लोकांनी या दोघींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघीही आगीच्या विळख्यात सापडलेल्या होत्या. दोघांनीही कसंबसं बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
किचनमध्ये गेल्या अन्
शनिवारी ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. नीर गावातील संजीव सिंह गौर यांच्या मुलीच्या लग्नाची घरात तयारी सुरू होती. रविवारी वरात येणार होती. पाहुणे लग्न सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आले होते. त्यावेळी शनिवारी संजीव यांच्या पत्नी मंजू या किचनमध्ये पाहुण्यांसाठी काही तरी बनवण्यासाठी गेल्या.
त्यांना मदत करण्यासाठी संजीवची 50 वर्षीय बहीण शर्मिलाही किचनमध्ये गेली होती. दोघींनी गॅस सुरू केला. त्यांनी माचिस लावताच घरात जोरदार ब्लास्ट झाला अन् अग्नितांडव झालं. घरातच गॅस लिकेज झालेला होता. त्यामुळे माचिस ओढताच आगीचा भडका उडाल्याचं अप्प पोलीस अधीक्षक नृपेंद्र यांनी सांगितलं.