राजौरीमध्ये कारीसह 2 दहशतवादी ठार, मात्र 5 जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दहशतवाद्यांमध्ये लष्कर कमांडर कारीचाही समावेश आहे. मात्र, या चकमकीत लष्कराचे ५ जवानही शहीद झाले.
जम्मू-काश्मीर : राजौरी येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. राजौरीच्या कालाकोटमध्ये बुधवारपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यादरम्यान सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये लष्करचा कमांडर कारीचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी पाठवण्यात आले होते. ठार झालेले दोन्ही दहशतवादी आयईडी बनवण्यात आणि ऑपरेट करण्यात माहीर होते. याशिवाय हे दोघेही लपून बसले होते. या कारवाईत आतापर्यंत लष्कराचे ५ जवान शहीद झाले आहेत.
कारी असे मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्याचे नाव असून तो लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर आहे. त्याला पाकिस्तान आणि अफगाण आघाडीवर प्रशिक्षण देण्यात आले आहे. कारी हा पाकिस्तानचा नागरिक असून तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे. कारी हा डांगरी आणि कांडी हल्ल्याचा मास्टरमाईंडही मानला जातो. गेल्या एक वर्षापासून कारी आपल्या ग्रुपसोबत जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पूंछमध्ये सक्रिय होता.
काल 4 जवान शहीद
एक दिवस आधी जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. यादरम्यान दोन कॅप्टनसह चार लष्करी जवान शहीद झाले. तर आज लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी ९ वाजता लष्कराला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. या चकमकीत लष्कराचे दोन कॅप्टन आणि दोन जवान शहीद झाले.
अचानक गोळीबार सुरू झाला
घटनास्थळी दोन दहशतवादी असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. शोध मोहिमेदरम्यान धर्मसालच्या बाजीमल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. या गोळीबारात दोन अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या शोध मोहिमेत लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांसह पॅराट्रूपर्सही सहभागी झाले होते. मात्र दहशतवादी घात घालून बसले होते. लष्कर त्या दहशतवाद्यांजवळ पोहोचताच दहशतवाद्यांनी लष्करावर वेगाने गोळीबार सुरू केला.