भारत-चिनी सैन्यात झटापट, 20 ते 30 जवान जखमी, महत्त्वाची माहिती आली समोर
या झटापटीत दोन्ही बाजूचे 20 ते 30 जवान जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.
नवी दिल्ली : भारत-चीन सैन्यात पुन्हा एकदा झटापट झाल्याची बातमी समोर आलीय. अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये ही घटना घडलीय. संबंधित घटना ही 9 डिसेंबरला घडली. या झटापटीत दोन्ही बाजूचे 20 ते 30 जवान जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. या झटापटीनंतर दोन्ही देशाच्या सैन्यातील कमांडर स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही बाजूचे सैन्य मागे घेण्यात आले.
याआधीसुद्धा LOC वर दोन्ही देशाच्या सैन्यामध्ये झटापट झाली होती. याआधी चीनने गलवानमध्ये घुसखोरी केली होती. त्यावेळीसुद्धा दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती.
त्यावेळी दोन्ही बाजूच्या जवान जखमी झाले होते. पण त्यानंतरही चीनच्या कुरापती थांबताना दिसत नाहीयत. विशेष म्हणजे गलवान व्हॅलीमध्ये भारतीय सैनिकांनी चिनी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
काही महिन्यांपूर्वी चिनी सैनिकांनी सिक्कीमच्या नकुला भागातही कुरापत काढली होती. त्यावेळी देखील भारत-चिनी सैन्यात झटापट झाली होती. पण त्यानंतरही आज पुन्हा झटापटीची बातमी समोर आली.
दरम्यान, तवांगमध्ये घडलेली घटना ही तीन दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर आज याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आलीय. भारतीय सैनिकांची एक टीम तवांगमध्ये गस्त घालत होती त्यावेळी चिनी सैन्याचं पथकही तिथे आलं. यावेळी दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये वाद झाला.
बाचाबाचीनंतर दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. या घटनेत दोन्ही बाजूचे काही सैनिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.