विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी अख्खी नाव तलावात बुडाली, 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू; टाहो आणि काळीज चिरणारा आक्रोश!
गुजरातच्या बडोदा जिल्ह्यात खूप मोठी दुर्घटना घडली आहे. बडोदा जिल्ह्यातील हरणी तलावात 25 विद्यार्थी त्यांच्या दोन शिक्षकांसह एका नावेतून फिरायला गेले होते. पण त्यांचं जहाज पाण्यात डुबलं. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यापैकी एकाही विद्यार्थाने आणि शिक्षकाने नावेत बसताना लाईफ जॅकेट घातलेलं नव्हतं.
बडोदा | 18 जानेवारी 2024 : गुजरातच्या बडोदा जिल्ह्यात खूप मोठी दुर्घटना घडली आहे. बडोदा जिल्ह्यातील हरणी तलावात 25 विद्यार्थी त्यांच्या दोन शिक्षकांसह एका नावेतून फिरायला गेले होते. पण त्यांचं नाव पाण्यात डुबलं. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यापैकी एकाही विद्यार्थाने आणि शिक्षकाने नावेत बसताना लाईफ जॅकेट घातलेलं नव्हतं. त्यांना लाईफ जॅकेट न देताच नावेत बसवण्यात आलं होतं. तसेच संबंधित नावेची क्षमता ही केवळ 16 जणांची होती. पण त्यामध्ये तब्बल 27 जणांना बसवण्यात आलं होतं. त्यामुळे संपूर्ण नाव तलावात पलटी झाली. या अपघातात आतापर्यंत 11 विद्यार्थी आणि त्यांच्या 2 शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या 13 जणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाले आहेत. तर इतर विद्यार्थ्यांचा शोध सुरु आहे. अतिशय सुन्न करणारी ही घटना आहे. या घटनेमुळे तब्बल 13 कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने प्रशासन आणि अग्निशमन दलाची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली. अग्निशमन दलाच्या जवानांना काही विद्यार्थ्यांचा प्राण वाचवण्यात यश आलं आहे. या विद्यार्थ्यांना तातडीने SSG रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी प्रशासनाच्या टीमसह डीसीपी, एसीपी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे. बचावाचं कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.
हरणी तलावात बुडालेले हे सर्व विद्यार्थी बडोद्याच्या न्यू सनराइज शाळेचे विद्यार्थी आहेत. या बोटीची क्षमता 16 जणांना घेऊन जाण्याची होती. पण बोटीतून 27 जणांना घेऊन जाण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांसह दोन शिक्षिकाही होत्या. छाया सुरती आणि फाल्गुनी पटेल असं या शिक्षिकांची नावे आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार 11 विद्यार्थी आणि दोन शिक्षिकांचा मृत्यू झाला आहे.
#WATCH | Gujarat: A boat carrying children capsized in Vadodara’s Harni Motnath Lake. Rescue operations underway. pic.twitter.com/gC07EROBkh
— ANI (@ANI) January 18, 2024
दुर्घटनेवर सवाल
या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाच्या कामावर सवाल केले जात आहेत. 16 लोकांना घेऊन जाण्याची बोटीची क्षमता असताना 27 लोकांना बोटीत का बसवण्यात आलं? विद्यार्थ्यांना लाइफ जॅकेट का दिलं नाही? हरणी तलावात जेव्हा विद्यार्थ्यांना नावेत बसवलं जात होतं, त्यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना का रोखलं नाही? दोन वेगवेगळ्या नावेत विद्यार्थ्यांना का बसवलं नाही? असे सवाल करण्यात येत असून जिल्हा प्रशासनाला या प्रश्नांनी घेरलं आहे.
मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विटरवरून दु:ख व्यक्त केलं आहे. वडोदराच्या हरणी तलावात नाव उलटल्याने झालेल्या दुर्घटनेत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ही दु:खद घटना आहे. मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना करतो. या दु:खाच्या प्रसंगात या मुलांच्या कुटुंबीयांप्रती मी शोक व्यक्त करतो. तलावात बुडालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी मदत करत आहे, असं पटेल यांनी म्हटलंय.
10 विद्यार्थी वाचले
एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं वडोदराचे खासदार रंजनबेन धनंजय भट्ट यांनी म्हटलंस आहे. तर ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच या दुर्घटनेतील 10 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आल्याचं, राज्याचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी म्हटलंय.