लोकसभा अध्यक्षांची सर्वात मोठी कारवाई, विरोधी पक्षांचे 33 खासदार निलंबित; कारण काय?
लोकसभेत कामकाज सुरू असताना गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर प्रचंड मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतील एकूण 33 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यातील अनेक खासदारांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. त्या निलंबित खासदारांची संख्या 47 झाली आहे.
नवी दिल्ली | 18 डिसेंबर 2023 : लोकसभेत कामकाज सुरू असताना गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर प्रचंड मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतील एकूण 33 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यातील अनेक खासदारांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्षांनी ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी निलंबित केलेल्या खासदारांमध्ये अधीर रंजन चौधरी, टीआर बालू, दयानिधी मारन यांचा समावेश आहे.
संसदेचं हिवााळी अधिवेशन सुरू आहे. आजही अधिवेशनात गोंधळ पाहायला मिळाला. आजही सभागृहात प्रचंड गोंधळ झाल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी 33 खासदारांना निलंबित केले आहे. लोकसभा अध्यक्षांचं विरोधी पक्षाचे खासदार ऐकतच नव्हते. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांना कठोर पाऊल उचलावं लागलं आहे. शुक्रवारीच 13 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर आज ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
काँग्रेस नेत्यांचाही समावेश
लोकसभा अध्यक्षांनी ज्या खासदारांना निलंबित केलं आहे. त्यात काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश आहे. याशिवाय काँग्रेससह टीएमसी खासदारांनाही निलंबित करण्यात आलं आहे. दयानिधी मारन आणि सौगत राय यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. आज निलंबित करण्यात आलेल्या अनेक खासदारांची नावे समोर आली आहेत.
विशेष अवधीसाठी निलंबित
लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. काही खासदार तर वेलमध्ये येऊन गोंधळ घालत होते. या सर्व खासदारांना संसदेच्या विशेष अवधीसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
कल्याण बनर्जी, ए राजा, दयानिधि मारन, अपारूपा पोद्दार, प्रसून बनर्जी, ई टी मोहम्मद बशीर, गणेशन सेल्वम, सी एन अन्नादुरई, अधीर रंजन चौधरी, टी सुमति, के एन कनि, एन के प्रेमचंद्रन, शताब्दी रॉय, सौगत रॉय, कौशलेंद्र कुमार, एन्टो एंटनी, एस एस पलनिमणिक्कम, प्रतिमा मंडल, काकोली घोष दस्तीदार, के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस रामालिंगम, सुरेश के, डॉ अमर सिंह, टी आर बालू, एस तिरुवुकरशर, विजय वसंत, गौरव गोगोई, राजमोहन उन्नीथन, डॉ के जयकुमार, डॉ के वीरास्वामी, असित कुमार मल, अब्दुल खलिका आदी खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आता पर्यंत निलंबित खासदारांची संख्या 47 झाली आहे.