Corruption case: पार्थ चॅटर्जी यांचे 50 कोटी आणि 5 किलो सोनं सरकारी खजिन्यात, अर्पिता मुखर्जीची एक-एक सोन्याची बांगडी अर्धा किलोची
अर्पिता मुखर्जी हिच्या नावे 31 विमा पॉलिसी असल्याचे समोर आले आहे. यात नॉमिनी म्हणून पार्थ चॅटर्जी यांचे नाव आहे. 60 पेक्षा जास्त बँकेची खाती समोर आली आहेत. या खात्यांतही कोट्यवधी रुपये जमा आहेत. हे पैसे बनावट कंपन्या स्थापन करुन त्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. या सगळ्या कंपन्या केवळ कागदोपत्री आहेत, प्रत्यक्षात यातील एकही कंपनी अस्तित्वातच नाही.
कोलकाता – ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात नंबर दोनचे स्थान असलेले माजी मंत्री पार्थ चॅटर्जी (Parth Chatterjee)यांना आता 31 ऑगस्टपर्यंत जेलमध्ये राहावे लागणार आहे. हायकोर्टाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. या सुनावणीत पार्थ यांना गंभीर आजार असल्याचा युक्तिवाद वकिलांकडून करण्यात आला. त्यांचे हिमोग्लोबिन कमी झाल्याचेही सांगण्यात आले. ते कोलकात्यातच राहतात, त्यामुळे ते फरार होणार नाहीत असेही सांगण्यात आले. मात्र तरीही कोर्टाने त्यांना जामीन दिलेला नाही. हे तर झाले कस्टडीचे मात्र त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग बाब आहे ती त्यांच्या संपत्तीची. ईडीने कोर्टात सांगितले की पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) यांच्या घरी छापे टाकण्यात आले. त्यात अर्पिता यांच्या नावावर अनेक स्थावर मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. 23 जुलै रोजी टाकलेल्या छाप्यात 21 कोटी 90 लाख रुपयांची रोकड तर 27 जुलै रोजी मारलेल्या छाप्यात 27 कोटी 90 लाख रुपये सापडले आहे. इतकचं नाही तर या फ्लॅटमधून 5कोटींचे सोनेही( Gold worth 5 crores) जप्त करण्यात आले आहे. हे सोने बिस्किटं आणि दागिन्यांच्या रुपातील आहे. या ठिकाणी मिळालेल्या एकेका बांगड्यांचे वजन अर्धा किलो इतके आहे. यासह सोन्याचा पेनही जप्त करण्यात आला आहे.
60 पेक्षा जास्त बँकांची खाती, 31 विमा पॉलिसी
अर्पिता मुखर्जी हिच्या नावे 31 विमा पॉलिसी असल्याचे समोर आले आहे. यात नॉमिनी म्हणून पार्थ चॅटर्जी यांचे नाव आहे. 60 पेक्षा जास्त बँकेची खाती समोर आली आहेत. या खात्यांतही कोट्यवधी रुपये जमा आहेत. हे पैसे बनावट कंपन्या स्थापन करुन त्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. या सगळ्या कंपन्या केवळ कागदोपत्री आहेत, प्रत्यक्षात यातील एकही कंपनी अस्तित्वातच नाही. या सगळ्या कंपन्या आणि व्यवहारांची चौकशी अद्याप सुरु आहे. 2012 सालात या दोघांच्या नावे एक पार्टनरशीप डीड करण्यात आली होती. आता यांनी ट्रस्टच्या माध्यमातून नवा काही गैरव्यवहार केला आहे का, याचाही शोध घेण्यात येतो आहे.
70 वर्षांचे पार्थ चॅटर्जी
70 वर्षांचे पार्थ चॅटर्जी हे 23 जुलै 2022 पासून 27 दिवस झाले तरी अजूनही जेलमध्ये आहेत. पार्थ कोठडीत असताना ईडीने कोट्यवधी रुपये, सोने, दागिने, मालमत्ता, बँक अकाऊंट्स जप्त केले आहेत. त्यांच्याविरोधात सुरु असलेल्या कारवाईत त्यांना जामीन देणे योग्य ठरणार नाही अशी भूमिका कोर्टात मांडण्यात आली होती.
कॅश आणि सोने आरबीआयच्या तिजोरीत
पार्थ आणि अर्पिता यांच्याकडून मिळालेली 50 कोटींची कॅश आणि 5 कोटींचे दागिने हे आरबीआयच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहेत. जर हे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले तर त्यांना ही सारी संपत्ती परत केली जाईल. मात्र आरोप खरे निघाले तर सगळी संपत्ती ही सरकार जमा होणार आहे. त्याचबरोबर दोघांनाही सात वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
लाच घेऊन केली शिक्षकांची भरती
या छापेमारीत लाच घेऊन शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे पुरावेही मिळाले आहेत. असिस्टंट टीचर्स आणि प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या भरतीतही मोठ्या प्रमाणात पैशांची देवाम घेवाण झाल्याचे समोर आले आहे. यात पार्थ आणि अर्पिता यांचा केवळ सहभागच नाही, तर त्यांनी त्यासाठी पूर्ण मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. काही अशी कागदपत्रेही सापडली आहेत, की ज्यामुळे यात मनी लाँड्रिंग केल्याचाही संशय बळावला आहे. अर्पिताच्या नावाने अनेक कंपन्यांची नोंदणी झाल्याचेही स्पष्ट झालेले आहे.