दामोदर मावजो आणि नीलमणी फूकन यांना 57 वा ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा, कोकणी, आसामीचा सन्मान
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दोन्ही साहित्यिक हे सत्तरीच्या पुढचे आहेत. ह्या पुरस्कारामुळे कथा, कविता आणि कादंबरी अशा साहित्याच्या तिनही शाखांचा गौरव झाल्याची भावन व्यक्त केली जातेय.
देशाचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार ज्ञानपीठ (Dnyanpith puraskar) यावर्षी दोन साहित्यिकांना जाहीर झालाय. त्यात कोकणी कथा, कादंबरीकार दामोदर मावजो (Damodar Mavjo) आणि आसामी कवी नीलमणी फूकन यांना यांचा समावेश आहे. संस्थेनं काल 57 व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा केली. दरवर्षी जगभर जसं साहित्याच्या नोबेल पुरस्काराची प्रतिक्षा असते तेवढीच प्रतिक्षा ज्ञानपीठ पुरस्काराचीही असते. ज्ञानपीठ हा देशातला सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार मानला जातो. आसामी भाषेतल्या साहित्यिकाला ज्ञानपीठ मिळण्याची ही तिसरी वेळ आहे तर कोकणी भाषेतलं हे दुसरं ज्ञानपीठ आहे. यापूर्वी आसामी भाषेत 1979 साली बी.के.भट्टाचार्य आणि 2000 साली इंदिरा गोस्वामी यांना ह्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता नीलमनी फूकन यांना पुरस्कार जाहीर झालाय. कोकणी भाषेत मावजोंच्या आधी 2016 साली रविंद्र केळेकर यांना ज्ञानपीठ दिलं गेलं होतं. त्यानंतर आता मावजोंचा सन्मान होतोय. 11 लाख रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरुप आहे.
कोण आहेत दामोदर मावजो?
दामोदर मावजो (Who is Damodar Mavjo?) म्हटलं की कोकणी साहित्याला समृद्ध करणाऱ्या लघूकथा वाचकांना आठवतात. 77 वर्षांचे मावजो यांचा जन्म 1944 साली दक्षिण गोव्यातील माजोर्डा इथे झाला. शाळेत ते गोव्यातच गेले तर पदवी शिक्षण मात्र त्यांनी मुंबईत पूर्ण केलं. गांथन हा मावजोंचा पहिला कथासंग्रह तो 1971 साली प्रकाशित झाला. त्यानंतर 1983 मध्ये त्यांच्या ‘कार्मोलिन’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ह्या कादंबरीचे बारा देशी परदेशी भाषांमध्ये भाषांतर केले गेले आहे. गोवा कला अकादमी आणि गोवा साहित्य मंडळाच्या पुरस्कारांनीही मावजो सन्मानित आहेत.
कोण आहेत नीलमणी फूकन?
नीलमणी फूकन (Who is Neelmani Phukan) हे आसामी भाषेतलं परिचित नाव आहे. आधूनिक आसामी कवितेचा चेहरा म्हणून नीलमनी फूकन यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा जन्म 1933 साली गोलाघाट जिल्ह्यातल्या डेरगावात झाला. 1981 साली कोबिता ह्या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तर 2002 साली साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दोन्ही साहित्यिक हे सत्तरीच्या पुढचे आहेत. ह्या पुरस्कारामुळे कथा, कविता आणि कादंबरी अशा साहित्याच्या तिनही शाखांचा गौरव झाल्याची भावन व्यक्त केली जातेय.
हे सुद्धा वाचा:
प्राजक्त तनपुरे अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार, किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचा नवा नेता
निरोगी राहण्यासाठी हिवाळ्याच्या हंगामात गाजराचा आहारात समावेश करा, वाचा फायदे!