दिल्लीत आम आदमी पार्टीत महाभूकंप… मतदानाला पाच दिवस असतानाच 8 आमदारांनी पक्ष सोडला
दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे पाच दिवस बाकी असतानाच दिल्लीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीत मोठी फूट पडली आहे. आपच्या 8 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या आमदारांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून त्यांना चांगलंच सुनावलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे पाच दिवस बाकी असतानाच दिल्लीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीत मोठी फूट पडली आहे. आपच्या 8 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या आमदारांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून त्यांना चांगलंच सुनावलं आहे. त्रिलोकपुरीचे आमदार रोहित महरौलिया, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी, कस्तूरबा नगरचे मदनलाल, पालमी सीटचे आमदार भावना गौड, बिजवासनचे बीएस जून, आदर्शनगरचे पवन शर्मा, मादीपूरचे गिरीश सोनी आणि महरौलीचे नरेश यादव यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीत या सर्व आमदारांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यामुळे ते नाराज होते. आज त्यांनी थेट पक्षाला सोडचिठ्ठी देऊन केजरीवाल यांना चांगलाच झटका दिला आहे.
रोहित महरौलिया यांनी राजीनाम्यासोबत एक चिठ्ठीही केजरीवाल यांना लिहिली आहे. या चिठ्ठीतून त्यांनी केजरीवाल यांना चांगलच सुनावलं आहे. मी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्यावेळी माझी 15 वर्षाची नोकरी सोडली. हजारो वर्षापासून जातीभेद आणि भेदभावामुळे शोषण झालेल्या समाजाला बरोबरीचा दर्जा देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक न्यायाचं स्वप्न तुम्ही पूर्ण कराल असं मला वाटलं होतं. म्हणूनच मी तुमच्या आंदोलनात जोडलो गेलो होतो, असं रोहित महरौलिया यांनी चिठ्ठीत म्हटलंय.
जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा दलित समाज आणि वाल्मिकी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करू असं तुम्ही कितीतरी वेळा जाहीर सभांमधून सांगितलं. कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरी देऊ, कंत्राटी पद्धत रद्द करू, असंही तुम्ही सांगितलं. तुमच्यावर आम्ही विश्वास टाकला. आमच्या समाजाला तुमच्या पाठिशी उभं केलं. त्यामुळेच तुम्ही दिल्लीत तीनदा सत्तेत आला, याकडेही रोहित यांनी लक्ष वेधलं आहे.
व्होट बँक म्हणून वापर
त्यानंतरही कंत्राटी पद्धत बंद झाली नाही. 20-20 वर्षापासून खाडाबदली कामगार म्हणून काम करणाऱ्यांना कायमस्वरुपी नोकरी दिली गेली नाही. एकंदरीत तुम्ही माझ्या समाजासोबत होणारा भेदभाव कमी करण्यासाठी आणि त्यांचं शोषण रोखण्यासाठी काहीच केलं नाही. उलट तुम्ही केवळ व्होट बँक म्हणूनच माझ्या समाजाचा वापर केला, असा आरोप रोहित यांनी केला आहे.
आप भ्रष्टाचाराच्या विळख्यात
रोहित यांच्यासोबतच आमदार नरेश यादव यांनीही चिठ्ठी लिहून राजीनामा दिला आहे. यादव यांनीही केजरीवाल यांना चांगलंच सुनावलं आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारे यांनी मोठं आंदोलन उभं केलं. त्यातूनच आपचा जन्म झाला. भ्रष्टाचार संपवण्यासाठी आपचा उदय झाला होता. पण आम आदमी पार्टी भ्रष्टाचार कमी करू शकली नाही हे मला खेदाने सांगावं लागतं. उलट आम आदमी पार्टी भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकली आहे, असं यादव यांनी म्हटलंय.
आपकडून प्रामाणिक राजकारण होईल यासाठी मी आपमध्ये आलो. पण आज पक्ष नावालही इमानदार उरला नाही. मी महरौली विधानसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षापासून 100 टक्के प्रामाणिकपणे काम केलंय. मी प्रामाणिकपणाचं राजकारण केलं, लोकांशी मिळून मिसळून राहिलो हे माझ्या मतदारसंघातील लोकही सांगतील, असं यादव यांनी सांगितलं.
मी मतदारसंघातील अनेक लोकांशी संवाद साधला. प्रत्येकाचं म्हणणं हेच होतं की आप भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडला आहे. आम आदमी पार्टी भ्रष्ट पार्टी झाली आहे. तुम्ही हा पक्ष सोडला पाहिजे, असं मतदारांचं म्हणणं पडलं. आपने लोकांचा विश्वासघात केलाय. प्रामाणिकपणाचं राजकारण करण्याचं वचन देणारा पक्षच आज भ्रष्टाचाराच्या गाळात दबला गेल्याचं मतदारांचं म्हणणं आहे, याकडेही यादव यांनी लक्ष वेधलं.