इंडिया आघाडीला मोठा धक्का, आणखी एका पक्षाने स्वबळावर रिंगणात उतरवले उमेदवार
मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी जाहीर केले की, त्यांचा पक्ष पीडीपी जम्मू-काश्मीरमध्ये एकट्याने निवडणूक लढवेल. पीडीपी काश्मीर खोऱ्यातील तीन जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे मुफ्ती यांनी सांगितले. इतर दोन जागांबाबत लवकरच निर्णय होईल असं ही त्या म्हणाल्या.
Loksabha election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी सगळेच पक्ष कामाला लागले आहे. प्रत्येक पक्षाकडून हळूहळू उमेदवार जाहीर केले जात आहेत. देशात सात टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. ज्या 19 एप्रिलपासून सुरू होत आहे. असं असताना विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीने सर्व तीन जागांवर उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला-ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात कुठलीही युती होऊ शकलेली नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष आता वेगवेगळे निवडणूक लढवणार आहेत.
याआधी जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या 6 जागा होत्या. पण लडाखला वेगळा केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या ५ जागा उरल्या आहेत. ज्यामध्ये बारामुल्ला, श्रीनगर, जम्मू, अनंतनाग-राजौरी आणि उधमपूर याचा समावेश आहे.
मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत घेतली. ज्यामध्ये त्यांनी पीडीपी हा जम्मू-काश्मीरमध्ये एकट्याने निवडणूक लढवेल अशी घोषणा केली आहे. पीडीपी काश्मीर खोऱ्यातील तीन जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. जम्मूतील दोन लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल असे ही त्या म्हणाल्या आहेत.
नॅशनल कॉन्फरन्सच्या घोषणेनंतर पीडीपीने ही स्वबळाची घोषणा केली आहे. काश्मीर खोऱ्यातील तीनही जागा एकट्याने निवडणूक लढवणार असून नॅशनल कॉन्फरन्सने मियां अल्ताफ यांना अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. काँग्रेस सोडून स्वत:चा पक्ष स्थापन केलेले गुलाम नबी आझादही या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत.
मेहबूबा मुफ्ती यांनी INDIA Alliance चा मित्र पक्ष नॅशनल कॉन्फरन्स आणि ओमर अब्दुल्ला यांच्यावरही निशाणा साधलाय. मुफ्ती म्हणाल्या की, “नॅशनल कॉन्फरन्स आणि त्यांचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आमच्यासाठी कोणताही पर्याय सोडला नव्हता. पक्षाचे संसदीय मंडळ काही दिवसांत उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेईल. जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय पक्षांनी एकजूट राहणे ही काळाची गरज आहे. पण नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाची वृत्ती दुःखी होती.”
इंडिया आघाडीच्या बैठकींचा संदर्भ देताना, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, “जेव्हा मुंबईत इंडिया अलायन्सची बैठक झाली, तेव्हा मी तिथे म्हणाले होते की नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, तेच निर्णय घेतील. मला आशा होती की ते आपले हित बाजूला ठेवतील आणि युतीमध्ये राहतील. पण नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरमधील तीनही जागांवर एकतर्फी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.”