गौतम अदाणी यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त अदाणी कुटुंबाकडून 60,000 कोटी रुपयांची देणगी, आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी उपयोग होणार
गौतम अदाणी याबाबत म्हणाले की, “प्रेरणादायी अशा माझ्या वडिलांच्या १०० व्या जयंतीबरोबरच चालू वर्ष हे माझ्या ६०व्या वाढदिवसाचे वर्षदेखील आहे आणि म्हणूनच माझ्या कुटुंबाने रु. ६०,००० कोटी रक्कम ही आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासाशी संबंधित अशा धर्मादाय उपक्रमांसाठी - विशेषत: देशाच्या ग्रामीण भागासाठी विनियोग करण्यासाठी जाहीर केली आहे.”

अहमदाबाद– अदाणी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी (Gautam Adani)यांचे वडील शांतीलाल अदाणी (Shantilal Adani)यांची शताब्दीजयंती आणि गौतम अदाणी यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त अदानी कुटुंबाने विविध सामाजिक उपक्रमासाठी 60,000 कोटी (60000 Crores donation)रुपयांची देणगी देण्याचे वचन जाहीर केले आहे. अदाणी फाऊंडेशनद्वारे हा निधी प्रशासित केला जाणार आहे. अदाणी समुहाचे अध्यक्ष श्री गौतम अदाणी याबाबत म्हणाले की, “प्रेरणादायी अशा माझ्या वडिलांच्या 100 व्या जयंतीबरोबरच चालू वर्ष हे माझ्या 60व्या वाढदिवसाचे वर्षदेखील आहे आणि म्हणूनच माझ्या कुटुंबाने रु. 60,000कोटी रक्कम ही आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासाशी संबंधित अशा धर्मादाय उपक्रमांसाठी – विशेषत: देशाच्या ग्रामीण भागासाठी विनियोग करण्यासाठी जाहीर केली आहे.”
“मूलभूत स्तरावर, या तिन्ही क्षेत्रांशी संबंधित या उपक्रमाकडे सर्वसमावेषकतेने पाहिले पाहिजे आणि यामार्फतच न्याय्य–समता आणि भविष्यासाठी सज्ज अशा भारतनिर्माणाकरिता एकत्रितरित्या आपण सारथ्य निर्माण करत आहोत. मोठ्या उपक्रमाचे नियोजन आणि त्याच्या अंमलबजावणीचा आमचा अनुभव आणि अदाणी फाऊंडेशनने केलेल्या कार्यातून मिळालेला वस्तूपाठ हे आम्हाला अशा मोहिमेला अनोख्या रितीने गती देण्यास साहाय्यभूत ठरतील. अदाणी कुटुंबाच्या या योगदानामुळे आमच्या ‘ग्रोथ विथ गुडनेस’ या तत्त्वज्ञानाची पूर्तता करण्यासाठी अदाणी फाऊंडेशनच्या आजवरच्या प्रवासात बदल घडवून आणण्याची उत्कट इच्छा असलेल्या काही उज्ज्वल असे मन आकर्षित करण्याचा आमचा मानस आहे”, असेही ते म्हणाले.
अझीम प्रेमजी यांच्याकडूनही शुभेच्छा
अझीम प्रेमजी फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि विप्रो लिमिटेडचे संस्थापक – अध्यक्ष आणि समकालीन एक महान दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे अझीम प्रेमजी या प्रसंगी म्हणाले, “गौतम अदाणी आणि त्यांच्या कुटुंबाची दातृत्वासाठीची बांधिलकी हे, महात्मा गांधी यांच्या संपत्तीच्या विश्वस्ततेचे तत्त्व जगण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, याचे उदाहरण म्हणून स्थापित होऊ शकते. आपण सर्वजण आपल्या व्यवसायाच्या यशाच्या शिखरावर असताना आणि सूर्यास्ताच्या प्रतिक्षेची तमा नसताना हे ध्येय राखणे महत्त्वाचे ठरते.” ते म्हणाले की, “आपल्या देशासमोरील आव्हान आणि संभाव्यता पाहता संपत्ती, प्रदेश, धर्म, जात अशा सर्वांचा बिमोड करून आपण एकत्र काम केले पाहिजे ही आजमितीला काळाची गरज आहे. राष्ट्रीय स्तरावरील अशा महत्त्वाच्या प्रयत्नासाठी मी गौतम अदाणी आणि त्यांच्या फाउंडेशनला शुभेच्छा देतो.”
शाश्वत विकास उद्दिष्टांसह (SDGs) समाजाच्या बदलत्या आवश्यकतेच्या पूर्तीला अदाणी फाऊंडेशनने वर्षानुवर्षे प्रतिसाद दिला आहे – मग ती शाश्वत उपजीविका, आरोग्य आणि पोषण, आणि सर्वांसाठी शिक्षण असो किंवा पर्यावरणविषयक समस्यांना हाताळणे – महिलांच्या सक्षमीकरणावर वाढीव लक्ष केंद्रित करून तळागाळातील अनेक सहयोगांसह कार्य करणे आदी होय. आजमितीला भारतातील 16 राज्यांमधील 2409 गावांमधील 37 लाख सहभागी या उपक्रमामध्ये आहेत.
अदाणींबद्दल माहिती
अहमदाबाद येथे मुख्यालय असलेला अदाणी समूह हा भारतातील सर्वातमोठा आणि सर्वात वेगाने वृद्धिंगत होत असलेला विविध क्षेत्रात कार्यरत असलेला समूह आहे. अदाणी समूह हा लॉजिस्टिकस (बंदरे, विमानतळ, जहाज वाहतूक आणि रेलवे), तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती, वीज निर्मिती, पारेषण आणि वितरण, अपारंपरिक ऊर्जा, नैसर्गिक वायू वितरण, पायाभूत सुविधा, कृषी (कमोडिटीज, खाद्य तेल, खाद्य पदार्थ, शीतगृहे, धान्य गोदामे), रिअल इस्टेट, सार्वजनिक वाहतूक क्षेत्राला लागणाऱ्या पायाभूत सुविधा, संरक्षण आणि एरोस्पेस आणि अन्य क्षेत्रात कार्यरत आहे.