खुशखबर! जंगलात चित्त्यांचा दबदबा वाढणार; नामिबियातून आणलेली मादी चित्ता देणार पिल्लांना जन्म
नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांपैकी तीन नर चित्ते आहेत. त्यांचे वय 2 ते 5 वर्, आहे. गेल्या 70 वर्षात भारतातून चित्ते लुप्त झाले आहेत.
भोपाळ: देशात चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 17 सप्टेंबर रोजी नामिबियातून आठ चित्ते मध्यप्रदेशातील (madhya pradesh) कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. त्यात तीन मादी चित्ते (Cheetah) आहेत. यातील आशा नावाची मादी चित्ता पिल्लांना जन्म देणार असल्याची माहिती समोर आली आहे. वन अधिकारी या मादी चित्त्याची मॉनिटरिंग करत आहेत. दरम्यान, या वृत्ताला कुणीही अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. कुनो नॅशनल पार्क (Kuno National Park) येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र, चित्त्यांच्या परिसरात जाण्यास पर्यटकांना परवानगी देण्यात येणार नाही, असं सूत्रांनी सांगितलं.
नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांपैकी तीन नर चित्ते आहेत. त्यांचे वय 2 ते 5 वर्, आहे. गेल्या 70 वर्षात भारतातून चित्ते लुप्त झाले आहेत. त्यामुळे भारताने नामिबियाशी करार करून तेथील चित्ते भारतात आणले. या चित्त्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने 450 चित्ता मित्र नियुक्त केले आहेत. हे ‘चित्ता मित्र’ जंगलातील चित्त्यांचं क्षेत्र, त्यांचं खाणं, त्यांच्या सवयी आणि त्यांच्यापासूनचा असलेला धोका याबाबतची माहिती जनतेला देणार आहेत.
ज्या दिवशी या चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येत होतं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी उपस्थित होते. मोदींनी आपल्या 72व्या वाढदिवसाचं औचित्य साधून या चित्त्यांना पिंजऱ्यातून जंगलात सोडलं होतं. या चित्त्यांना विशेष विमानाने मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये आणण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना कुनो नॅशनल पार्कात आणण्यात आलं. भारतात 18 राज्यातील सुमारे 70 हजार वर्ग किलोमीटर क्षेत्राहून अधिक 52 टायगर रिझर्व्ह आहेत. भारतात मोठ्या प्रमाणावर वाघ आढळून येतात.
1947मध्ये देशातील शेवटच्या चित्त्याचा मृत्यू छत्तीसगडमध्ये झाला होता. त्यानंतर 1952 मध्ये केंद्र सरकारकडून देशातून चित्ते लोप पावल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर देशात पुन्हा चित्त्यांचं वास्तव्य निर्माण करण्यासाठी आफ्रिकन चित्ता इंट्रोडक्शन प्रोजेक्ट इन इंडियाची 2009मध्ये सुरुवात झाली आहे. या प्रकल्पानुसार चित्त्यांना भारतात आणण्यासाठी भारताने नामीबियाशी एक करार केला होता.