Bihar Politics : या दिवशी बिहारमध्ये नवं सरकार स्थापन होणार, पाहा कोणी दिले संकेत
Bihar election : बिहारमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी बिहारमधील राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा बदलली आहे. कारण नितीश कुमार हे आता पुन्हा एकदा भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. यामुळे इंडिया आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Bihar politics : बिहारमध्ये नितीश कुमार हे एनडीएमध्ये जाण्याची शक्यता आता वाढली आहे. जेडीयू आणि भाजप यांच्यातील युतीची अंतिम चर्चा पूर्ण झाली आहे. त्यामुळे नितीशकुमार राजीनामा देणार आहेत. त्यानंतर ते भाजपसोबत युती करून नवीन सरकार स्थापन करतील. नितीश कुमार हे महाआघाडीतून बाहेर पडल्याने इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस अध्यक्ष तसेच लालू प्रसाद यादव यांनी देखील नितीश कुमार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो पूर्ण होऊ शकला नाही. केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले की, बिहारमध्ये ३१ जानेवारीला सरकार बदलणार आहे.
24 तासात चित्र स्पष्ट होईल
बिहारमधील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी सर्व काही सुरळीत झाल्याचे म्हटले आहे. २४ तासांत बिहारच्या हितासाठी काहीतरी चांगले घडेल असे त्यांनी म्हटले आहे. 24 तास थांबा त्यानंतर बिहारच्या हिताचे ठरणार असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी 31 जानेवारीपर्यंत सरकार बदलणार असून बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत दिले आहेत. पशुपती पारस हे सध्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. पण या दरम्यान त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर संपूर्ण चित्र स्पष्ट केले आहे.
तेजस्वी यादव काय म्हणाले
तेजस्वी यादव यांनीही बिहारमधील राजकीय परिस्थितीवर मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, काहीही चित्र असले तरी जनताच मालक आहे. जनतेसाठी काम करायचे आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या सरकारने काय केले हे सांगावे. राबडी देवी यांच्या घरी आरजेडीची बैठक झाली असून यावेळी तेजस्वी आणि लालू यादव दोघेही उपस्थित होते. दुसरीकडे भाजपच्या कोअर ग्रुपचीही पाटण्यात बैठक होत आहे. त्यामुळे बिहारमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कोणत्याही क्षणी नितीश कुमार आरजेडीपासून वेगळं होत भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात.
का नाराज आहेत नितीश कुमार?
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घराणेशाहीवरुन लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यावर लालू यांची मुलगी हिने देखील ट्विट करत नितीश कुमार यांना उत्तर दिले होते. पण वाद वाढल्य़ानंतर त्यांनी ट्विट डिलीट केले होते. यानंतर नितीश कुमार नाराज झाल्याचं बोललं जात आहे.
इंडिया आघाडीत ही नितीश कुमार नाराज असल्याची चर्चा होती. कारण आघाडीत त्यांना संयोजक केले गेले नव्हते. दुसरीकडे जागावाटपाची देखील कोणतीही चर्चा झाली नव्हती. चित्र सगळं अस्पष्ट असल्याने ते इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारी होते.