टीव्ही अँकरच्या प्रेमात अशी वेडी झाली महिला की लग्नासाठी तिने थेट…
प्रेमासाठी लोकं कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. हैदराबादमध्ये एक अशी घटना घडली आहे. ज्यामध्ये एका महिलेने थेट पुरुषाचे अपहरण केले. लग्नासाठी ती त्याच्या मागे लागली. पण त्याने नकार दिल्याने तिने थेट त्याचे अपहरण करुन त्याला मारहाण केली.
हैदराबाद : हैदराबादमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका व्यावसायिक महिलेने टीव्ही म्युझिक चॅनलच्या अँकरचा आधी पाठलाग केला. त्यानंतर लग्नासाठी त्याचे अपहरण केले. या घटनेची माहित होताच पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली. ज्यामध्ये महिलेला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. इतकंच नाही तर या महिलेने टीव्ही अँकरच्या कारमध्ये चक्क ट्रॅकिंग डिव्हाइस देखील लावले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी आणि त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी तिने ही गोष्ट केली.
पोलिसांनी माहिती दिली की, डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय करणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने दोन वर्षांपूर्वी एका मॅट्रिमोनी साइटवर टीव्ही अँकरचे फोटो पाहिले होता आणि त्यानंतर त्याच्याशी तिने मैत्री केली आणि मग चॅटिंग करु लागली. दोघांमध्ये संवाद सुरु असताना तिला कळले की, तरुणाने मॅरेज ब्युरोच्या वेबसाइटवर त्याच्या ऐवजी एका अँकरचा फोटो लावला आहे. त्यानंतर त्या महिलेने त्या अँकरचा शोध घेण्यास सुरुवात केली.
महिलेला टीव्ही अँकरशी लग्न करायचे होते
महिलेने त्या टीव्ही अँकरचा फोन नंबर मिळवला. त्यानंतर तिने अँकरशी संपर्क साधला. तेव्हा अँकरने तिला सांगितले की एका अज्ञात व्यक्तीने त्याचा फोटो वापरला आणि मॅट्रिमोनी साइटवर बनावट खाते तयार केले. त्यानंतर या संदर्भात सायबर क्राईम पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे. मात्र, त्यानंतरही महिलेने टीव्ही अँकरला मेसेज पाठवणे सुरूच ठेवले.
पोलिसांनी सांगितले की, टीव्ही अँकरने महिलेचा नंबर ब्लॉक केला होता. पण महिला अँकरशी लग्न करण्यावर ठाम होती. त्यासाठी तिने त्याचे अपहरण करण्याची योजना आखली. तिने अँकरचे अपहरण करण्यासाठी चार लोकांना कामावर ठेवले आणि त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अँकरच्या कारमध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस देखील लावले होते.
टीव्ही अँकरचे अपहरण
पोलिसांनी सांगितले की 11 फेब्रुवारी रोजी चार लोकांनी अँकरचे अपहरण केले आणि त्याला महिलेच्या कार्यालयात नेले. त्यानंतर त्याला मारहाण देखील केली. जीवाच्या भीतीने टीव्ही अँकरने महिलेच्या हाकेला उत्तर देण्याचे मान्य केले आणि त्यानंतरच त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली.
टीव्ही अँकरने या घटनेनंतर लगेचच पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेवर कलम ३६३ (अपहरण), ३४१ (चुकीचा प्रतिबंध), ३४२ (चुकीचा बंदिवास) आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, पोलिसांनी आरोपी महिलेला चार जणांसह अटक केली ज्यांना तिने अपहरण करण्यासाठी कामावर ठेवले होते.